ठाणे : दिवाळीच्या सणाला शुभेच्छा पत्रे, मिठाई व भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. या वर्षी राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी या परंपरेला गोसेवेची जोड दिली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा पत्रांबरोबर नागरिकांना गोमातेसाठी ११ किलो चारा अर्पण करण्याची अनोखी भेट देण्यात येत आहे. या उपक्रमासाठी चाऱ्याचे मूल्य आधीच अदा करण्यात आले असून, क्यूआर कोडच्या माध्यमातून गोसेवेची माहिती व चारा वितरणाचे छायाचित्र नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल.

गोसेवा ही भारतीय संस्कृतीतील श्रद्धा व सेवाभावाची परंपरा मानली जाते. मात्र, धावपळीच्या जीवनात अनेकांना इच्छा असूनही प्रत्यक्ष गोशाळेत जाऊन गोसेवा करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोसेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. आमदार केळकर यांच्या वतीने शुभेच्छा पत्रक प्राप्त होणाऱ्या व्यक्तीच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून गोमातेसाठी ११ किलो चारा समर्पित करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी प्रीपेड गोसेवा गिफ्ट कार्ड तयार करण्यात आले असून, त्यावर क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित गोसेवा समर्पित करता येणार आहे. त्यानंतर ताजा व पौष्टिक चारा गोशाळेतील गायींपर्यंत पोहोचविण्यात येईल. चारा वितरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित गोशाळेची माहिती, चारा पोहोचल्याची छायाचित्रे व लोकेशनसह तपशील लाभार्थ्यांना व्हॉट्सॲपवर पाठविण्यात येतील. ही माहिती संबंधित व्यक्ती आपल्या सोसायटी वा संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही शेअर करू शकतील.

या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा पाठिंबा लाभला आहे. उपक्रमांतर्गत समर्पित करण्यात आलेला चारा गरजू गायींची सेवा करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळांपर्यंत पोहोचविला जाईल. चारा वितरणाची माहिती व छायाचित्रे उपलब्ध करून दिल्यामुळे गोसेवेसाठी दिलेल्या योगदानाची खात्रीही लाभार्थ्यांना मिळेल, अशी माहिती केळकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे शुभेच्छापत्रक देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हवामानातील बदल व अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पाणी व चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. अशा स्थितीत गोशाळांमधील गायींसाठी चाऱ्याची उपलब्धता करून देणे महत्त्वाचे ठरत आहे. दिवाळीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने गोसेवेचा हा उपक्रम राबवून सणाच्या आनंदासोबत सामाजिक आणि प्राणीसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.