ठाणे : गणेशमूर्तींना चित्रपटातील पात्रे, सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींचे स्वरूप देण्याच्या प्रकारावर भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला असून, अशा विकृत मूर्तींची विक्री करू नये, असा इशारा मूर्तिकार आणि विक्रेत्यांना देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात अशा मूर्ती आढळल्यास संबंधित स्टॉलवर जाऊन त्या मूर्तींचे विसर्जन करू, असे वक्तव्य भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी गणेशमूर्तींच्या आकार, रंग आणि सजावटीत विविध प्रयोग केले जातात. मात्र, यंदा काही ठिकाणी गणेशमूर्तींना चित्रपटातील पात्रे, प्रसिद्ध व्यक्ती किंवा अन्य लोकप्रिय व्यक्तिरेखांचे स्वरूप देण्याचे प्रकार समोर आले आहेत. कलात्मक प्रयोगाच्या नावाखाली गणेशमूर्तींचे विकृतीकरण होत असल्याचा आक्षेप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून घेतला जात आहे. गणेशमूर्ती ही श्रद्धेचा विषय असून, केवळ कलाकृतीच्या नावाखाली तिचे विकृतीकरण किंवा विटंबना सहन केली जाणार नाही, अशी भूमिका युवा मोर्चाने मांडली. सध्या काही ठिकाणी गणेशमूर्तींना चित्रपटातील पात्रे तसेच प्रसिद्ध व्यक्तींचे स्वरूप दिल्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारामुळे धार्मिक भावनांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला.

‘मूर्ती तयार करणाऱ्या कलाकाराला दोष द्यायचा की ती विकत घेणाऱ्याला, हा प्रश्न आहे. गणपतीबाप्पाबद्दल चांगले विचार आणि श्रद्धा मनात ठेवून त्यांच्या दृष्टिकोनातून मूर्तीला कलाकृतीचे स्वरूप द्यावे. मात्र, श्रद्धास्थानाचे विकृतीकरण करण्याचा प्रकार मान्य केला जाणार नाही,’ असे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील गणेशमूर्ती तयार करणारे कलाकार आणि विक्रेत्यांनी अशा मूर्तींची विक्री करू नये, असे आवाहनही करण्यात आले. अशा मूर्ती स्टॉलवर आढळल्यास त्या परत पाठवाव्यात किंवा सन्मानपूर्वक त्यांचे विसर्जन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा युवा मोर्चाचे पदाधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन मूर्तींचे विसर्जन करतील, असा इशाराही देण्यात आला.