पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांतच तब्बल ४२ दिवसांच्या रजेवर गेलेले ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल अखेर सोमवारी पालिकेत परतले. आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर ठाण्यातील राजकीय व्यवस्थेशी जुळवून घेणे न जमल्याने रजेवर गेलेले जयस्वाल आता पालिकेत परतणार नाहीत, अशी चर्चा रंगत असतानाच सोमवारी कामावर रुजू होत जयस्वाल यांनी कामाचा धडाकाच लावला. रात्री अधिकाऱ्यांच्या बैठकी, भाषणबाजी केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कळवा परिसराचा दौरा करून जयस्वाल यांनी येथील राजकीय ‘ठाणे’दारांशी जुळवून घेतल्याचे संकेत दिले आहेत. 

ठाण्याच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जयस्वाल यांनी अल्पावधीतच आपल्या भोवती वलय निर्माण केले. फोर जी तंत्रज्ञानासाठी भूमिगत वाहिन्या टाकण्याकरिता दिलेली परवानगी नाकारत रिलायन्स उद्योग समूहास तब्बल २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावून त्यांनी राजकीय तसेच कॉपरेरेट क्षेत्रात जरबही निर्माण केली. तसेच पालिकेचा अर्थसंकल्प मांडतानाही करवाढ करून शिस्तीचे प्रत्यंतर दिले. मात्र, हे करत असताना शहरातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेशी बिनसल्याने जयस्वाल हे रजेवर गेल्याचे बोलले जात होते. पालकमंत्री एकनाथ िशदे आणि त्यांच्यातील विसंवादाचे किस्सेही दबक्या आवाजात चíचले जात होते. त्यामुळे रजेवर गेलेले जयस्वाल पुन्हा परतणारच नाहीत, अशी चर्चा होती. परंतु, सोमवारी जयस्वाल यांनी हे अंदाज खोटे ठरवले.
तब्बल ४२ दिवसांच्या रजेवरून परतल्यानंतर जयस्वाल यांनी सोमवारी दिवसभर शहरातील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी उशिरा प्रमुख अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत जयस्वाल यांनी आपल्या रजेवर जाण्याचे कारण आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचा वृत्तान्तही सांगितल्याचे समजते. विशेष म्हणजे, सर्वसाधारण सभेच्या कामकाजासंबंधी या बैठकीत त्यांनी केलेल्या टिप्पणीवर उपस्थित अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्याचे बोलले जाते. यासंबंधी पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्याचे ते म्हणाले.
संजीव जयस्वाल आणि पालकमंत्र्यांच्या विसंवादाच्या चर्चा एकीकडे सुरु असताना मंगळवारी दिवसभर आयुक्तांनी पालकमंत्र्यांसोबत नालेसफाईचा पहाणी दौरा केल्याने या दोघांमध्ये नव्याने संवाद प्रस्थापित झाल्याची चर्चा रंगली होती. यावेळी कळवा खाडी तसेच या ठिकाणच्या कल्वर्टच्या कामाची संयुक्त पहाणीही या दोघांनी केली.