ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदकामातून निघालेल्या माती, मुरूम आणि दगडांचा मानपाड्यातील निवासी संकुलाबाहेर साठा केल्याप्रकरणी तहसीलदारांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर कंपनीने सुमारे १५०० ब्रास मातीचे ढिगारे हटवले असून, यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी कंपनीला गुरूवारी सुनावणीदरम्यान दिल्या आहेत.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी विविध ठिकाणी खोदकाम सुरू असून, त्यातून मोठ्या प्रमाणात माती, मुरूम आणि दगड बाहेर पडत आहेत. मानपाड्यातील कॉसमॉस लाउंज आणि सत्यशंकर रेसिडन्सीसमोरील परिसरात या मातीचे ढिगारे टाकण्यात आले होते. त्यामुळे पाणी साचणे, डासांची उत्पत्ती, धुळीचे प्रदूषण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार कॉसमॉस लाउंज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांनी केली होती. डम्परमधून रस्त्यावर माती आणि दगड पडत असल्याची तक्रारही करण्यात आली होती.
१९ ऑगस्ट रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात रहिवाशांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालात एमएमआरडीएच्या ताब्यातील जागेत सुमारे १५०० ब्रास मातीचा साठा केल्याचे नमूद करण्यात आले. याची दखल घेत तहसीलदार उमेश पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नोटीस बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या नोटिशीनंतर कंपनीने संकुलाबाहेरील मातीचे ढिगारे हटवले. या प्रकरणी गुरुवारी तहसीलदार पाटील यांनी सुनावणी घेतली. या वेळी कॉसमॉस लाउंज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी पंकज ताम्हाणे, पल्लवी शेठ आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग हा नागरिकांच्या हितासाठीचा प्रकल्प आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम करताना नागरिकांना त्रास होईल, अशी कृती करू नये, अशा सूचना तहसीलदार पाटील यांनी सुनावणीदरम्यान कंपनीला दिल्याची माहिती संस्थेच्या सदस्य पल्लवी शेठ यांनी दिली. यासंदर्भात तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कंपनीने मातीचे ढिगारे हटवले असून, शासनाचा हा प्रकल्प नागरिकांसाठी आहे. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे माती टाकून नागरिकांना त्रास देऊ नये, अशा सूचना संबंधित कंपनीला दिल्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.
