ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघणारी माती वाहतूक कन्वेयर बेल्टऐवजी डम्परनेच करण्यात यावी, यासाठी ९० टक्के रहिवाशांची सहमती आहे. तर, केवळ दहा टक्के रहिवाशांचा विरोध आहे. मात्र, या रहिवाशांचीही आम्ही समजूत काढून याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे प्रकल्पबाधित रहिवाशांच्या समिती सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यामुळे माती वाहतूक कन्वेयर बेल्टऐवजी डम्परनेच होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. तसेच ठेकेदाराकडून नव्हे तर परिसरातील गृह प्रकल्पांच्या बांधकामांमुळे हवा प्रदुषण होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईदरम्यान निघाऱ्या मातीच्या वाहतूकीसाठी कन्वेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करून त्याऐवजी डम्परने माती वाहतूक करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयानुसार, दररोज ३५० डम्पर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदुषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचे काम पुन्हा वादात सापडले असून यासंबंधीचे वृत्त प्रसारित होताच प्रकल्पबाधित रहिवाशांच्या समिती सदस्य राकेश मोदी, आशुतोष शिरोलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भुमिका स्पष्ट केली.
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईतून निघणाऱ्या मातीची वाहतूक कशी करायची यावर गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तीन पर्याय दिले होते. युनी ॲपक्सपर्यंत भुयारी मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात करणे आणि त्या मार्गाद्वारे डम्परने माती वाहतूक करणे हा पहिला पर्याय होता. मातीची वाहतूक कन्वेयर बेल्टने करणे हा दुसरा पर्याय होता आणि स्वतंत्र मार्गिका तयार करून डम्परने माती वाहतूक करणे, हा तिसरा पर्याय होता, असे राकेश मोदी म्हणाले. पहिल्या पर्यायात भुयारी मार्ग तयार होण्यासाठी दोन ते तीन वर्षे काळ लागेल आणि इतका काळ कोणताही प्रकल्प थांबविला जाऊ शकत नाही.
दुसऱ्या पर्यायात कन्वेयर बेल्टची यंत्रणा उभारणे, त्याच्या दोन्ही बाजूला मार्ग रोधक उभारणे अशी कामे करावी लागणार असून यानंतरही हवा आणि ध्वनी प्रदुषणाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये स्वतंत्र मार्गिका तयार करून डम्परने वाहतूक केल्यास रस्ते वाहतूकीला अडथळा होणार नाही आणि स्थानिकांनाही त्रास होणार नाही. या तिन्ही पर्यायाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी कन्वेयर बेल्टऐवजी डम्परनेच करण्यात यावी, यासाठी ९० टक्के रहिवाशांची सहमती आहे. तर, केवळ दहा टक्के रहिवाशांचा विरोध आहे. मात्र, या रहिवाशांचीही आम्ही समजूत काढून याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे मोदी म्हणाले.
बिल्डरामुळे हवा प्रदुषण
मुल्लाबाग परिसरात २० फेब्रुवाराला हवा गुणवत्ता निर्देशांक २३४ इतका होता. १८ फेब्रुवारीला हवा गुणवत्ता निर्देशांक १४३ इतका होता. त्यात डम्परद्वारे माती वाहतूक सुरू झाल्यास ध्वनी, हवा प्रदुषणात वाढ होईल. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल, अशी भिती रहिवाशांनी व्यक्त केली होती. त्यावर मोदी यांनी स्पष्टीकरण देताना हवा प्रदुषणाची इतर कारणेही स्पष्ट केली. भुयारी मार्गाच्या ठेकेदाराकडून हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांना दिलेल्या निर्देशाचे ते पालन करीत आहेत. परंतु परिसरात बांधकाम प्रकल्प उभारण्यात येत असून तिथे बिल्डर नियम पाळत नसल्याने हवा प्रदुषण होत आहे. पालिकेनेही त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई केली आहे. तरी ते नियम पाळत नाहीत, असा दावा राकेश मोदी यांनी केला.
