ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या टीबीएम यंत्राचा शुभारंभ होत असतानाच हा बोगदा पर्यावरणपूरक असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बोगद्याची रचना जमीनीखाली असल्याने जैवविविधतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, तसेच, भरपाई म्हणून ११ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे आणि बोरिवली शहराला जोडणाऱ्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टनेल बोरिंग यंत्राचा (टीबीएम) शुभारंभ झाला. हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जात असून प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. या भागात अनेकदा बिबट्या तसेच इतर प्राणी आढळून आले होते. त्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाविषयी देखील चिंता व्यक्त केली जात होती. या बोगद्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून आंदोलन देखील केले होते. परंतु हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्यादा दावा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभा दरम्यान केला.
संपूर्ण प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असल्याने त्याचा कोणताही विपरीत परिणाम जैवविविधतेवर होणार नाही. या प्रकल्पामुळे प्रदूषणामध्ये घट होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी घेण्यात आली आहे. भरपाई वृक्षारोपणाचा भाग म्हणून ११ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
प्रकल्प कसा असेल?
– हा प्रकल्प ११.८४ किमी लांबीचा आहे. त्यापैकी १०.२५ किमी मार्ग संजय गाधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा म्हणजेच बोगद्याचा असेल. बोगद्यात दोन समांतर रस्ते बांधले जातील. हा प्रकल्प आगामी ठाणे कोस्टल रोड आणि इतर प्रमुख रस्त्यांशी जोडला जाणार आहे. नाशिक, नवी मुंबई आणि कल्याण येथून ठाणे, घोडबंदर बोरिवलीच्या दिशेने येणारी वाहने ठाणे शहराला वळसा घालून थेट बोगद्यात प्रवेश करु शकतील. बोरिवलीच्या दिशेने उड्डाणपूलांची जोडणी केल्याने दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिमेला प्रकल्प जोडला जाईल.
कसा असेल बोगदा?
– भारतातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एक हा बोगदा असेल. बोगदा तीन-तीन पदरी असेल. बोगद्यात प्रत्येकी दोन वाहतुकीसाठी आणि एक आपत्कालीन मार्ग असेल. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली अंतर २३ किमी वरून १२ किमी पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे ९० मिनीटांचा प्रवास १५ मिनीटांत होणार आहे. बोगद्यात प्रगत वायुवीजन आणि अग्निसुरक्षा प्रणाली असेल. तसेच धूर शोधक यंत्र, एलईडी आणि दिशादर्शक असतील. गाळ विल्हेवाट प्रणालीची पुनर्रचना, ध्वनी आणि वायू प्रदूषण मर्यादित करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टची लांबी कमी केली (३५० मीटरवरून १०० मीटर), डम्पिंग ट्रकसाठी समर्पित मार्गिका आणि ७ मीटर रुंद सेवा रस्ते असणार आहे.
नायक आणि अर्जुना
– ठाणे बाजूला ”नायक” आणि ”अर्जुना” नावाच्या टीबीएमचा वापर करून बोगद्याचे बांधकाम केले जात आहे. यातील दोन ठाणे दिशेकडे आणि दोन बोरिवली दिशेकडे असतील. टीबीएमची लांबी ९० मीटर, वजन २ हजार ५०० टन आणि व्यास १३.३४ मीटर असेल. मुंबईत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या कटरहेड्सपैकी एक आहे. हे यंत्र ”सिंगल-शील्ड, ओपन-टाइप” रचनेचा वापर करून चालते. कठीण खडकाळ परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे काम बजावते. टीबीएमच्या संरचनात्मक रचनेत उत्खननादरम्यान स्थिरता राखण्यासाठी शील्ड्सचा समावेश आहे.
