ठाणे : ठाणे शहरातील बहुचर्चित ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर रस्ते मार्गाने केवळ १५ मिनीटात पार केला जाणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.
ठाणे शहरातून बोरिवली गाठण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगच्या घोडबंदर मार्गाने घोडबंदर घाट, फाऊंटन रोड येथून प्रवास करावा लागतो. घोडबंदर मार्गावरून ठाणे-बोरिवली बसगाड्या, एसटीची देखील सर्वाधिक वाहतुक होते. हे अंतर वळसा घालून असल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर गाठण्यासाठी सुमारे एक तास लागतो. वाहतुक कोंडी झाल्यास हे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो.
घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची देखील वाहतुक होते. त्यामुळे येथील प्रवास धोकादायक देखील ठरतो. ठाणे ते बोरिवली हे अंतर वाहन चालकांना गाठता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) घोडबंदर येथील चितळसर मानपाडा जवळील मुल्लाबाग परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दुहेरी भुयारी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास अवघ्या १५ मिनीटांत बोरिवली गाठता येईल असा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून या भागात राष्ट्रीय उद्यानाजवळ खोदकामे सुरु होती. आता या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी टीबीएमद्वारे हा शुभारंभ होणार असून या शुभारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
