Thane Borivali Twin Tunnel Project Updates: ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाचा मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे. याठिकाणी बोअर यंत्राद्वारे भुयार खोदाईचे काम सुरू होणार आहे. परंतु या कामादरम्यान होणाऱ्या माती वाहतुकीचा त्रास होणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी रहिवाशांना त्रास झाल्यास तात्काळ काम थांबवून भुयारी मार्गे माती वाहतूक करू असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

ठाणे ते बोरिवली हे अंतर गाठण्यासाठी सुमारे एक तास लागतो. वाहतुक कोंडी झाल्यास हे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो. ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर रस्ते मार्गाने केवळ १५ मिनीटात पार केला जाणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. या प्रकल्पात बोअर यंत्राद्वारे भुयार खोदाईचे काम सुरू होणार असून या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या कामादरम्यान होणाऱ्या माती वाहतुकीचा त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांना पत्र निवेदन देऊन हा त्रास नेमका कसा होईल, याची सविस्तर माहिती दिली होती. या मुद्द्यांचा विचार करून माती वाहतुकीच्या प्रस्तावित योजनेचा पुनर्विचार करावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यापाठोपाठ त्यांनी रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही माहिती दिली. त्यामध्ये कॉसमॉस लाउंज संकुलातील पल्लवी शेट, पंकज ताम्हाणे, मोनिश खैरनार आणि नितीन सिंग यांचा समावेश होता. या सर्वानी माती विल्हेवाट योजनेबाबत रहिवाशांनी सर्व चिंता व्यक्त केली. दरम्यान, या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास संबंधित काम तात्काळ थांबवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भुयारी मार्ग पूर्ण करण्यात येईल आणि मातीची विल्हेवाट ही पूर्णपणे भूमिगत मार्गानेच केली जाईल, ज्यामुळे रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या वृत्तास नितीन सिंग यांनी दुजोरा दिला.