ठाणे : विकासाच्या वाटेवरील सर्व ‘खलनायक’ दूर झाले असून ‘नायका’चे काम सुरू झाले आहे. आम्ही सर्व महायुती म्हणून सोबत असल्याने हा वेग कोणालाही कमी करता येणार नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाणे – बोरिवली बोगद्याच्या कामाला ‘नायक’ या टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम ) लाँचिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थितीत होते.

बोरिवली दुहेरी टनेल प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार असून हा महाराष्ट्राच्या इतिहासातील गेम चेंजिंग प्रकल्प ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. २०२४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. २०२८ पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण होईल.

मध्यंतरी काही स्पीड ब्रेकर आले होते. मात्र ते दूर करून प्रकल्पाला गती दिली आहे, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगद्याचे काम करताना पर्यावरणाची काळजी घेणे मोठे आव्हान होते. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य होत असल्याचेही शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत शक्य होणार आहे.

हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून राज्यातील इतिहासातील एक ‘गेम चेंजींग ’ प्रकल्प ठरेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी देत आहोत. ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.असे ते म्हणाले. माझी स्वतः म्हणजे ‘डीसीएम’ची ‘टीबीएम’वर नजर असेल असेही ते म्हणाले.