ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमूना आहे. देशातील अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत सुविधेचा हा प्रकल्प आहे. ठाणे-मुंबईला जोडून वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची कामे सुरु असून मुंबई महानगरे कोंडीमुक्त करणार असल्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टीबीएम यंत्रणेचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी ‘नायक’ आणि ‘अर्जुना’ अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. ‘नायक’ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून, तर ‘अर्जुना ’ हे याच उद्यानातील प्राचीन वृक्षाच्या नावावरून देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. असा दावा फडणवीस यांनी केला. हा प्रकल्प भविष्यात ठाणे खाडी किनारी मार्गाशी जोडला जाणार असून प्रकल्पामुळे जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी असून त्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवली दिशेला ५.७५ किमी आणि ठाण्याच्या दिशेला सुमारे ६.७५ किमी लांबीचा बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे १६ हजार ६६४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प एमएमआरडीए मार्फत राबवण्यात येत असून मे २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे असेही फडणवीस म्हणाले.

या प्रकल्पाच्या कामाला ठाण्यातून सुरुवात झाली आहे. या कामावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज लक्ष ठेवून असतील.परिणामी हे काम वेगाने होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.