ठाणे : राज्य सरकारचे ठाणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ थोड्याचवेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प ठाणे आणि बोरिवली शहरातील अंतर कमी करणारा असून ठाण्यातील घोडबंदर भागातील कोंडीमध्येही या प्रकल्पामुळे घट होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. १०.२५ किमी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा आहे पाहूया…

ठाणे शहरातून बोरिवली गाठण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगच्या घोडबंदर मार्गाने घोडबंदर घाट, फाऊंटन रोड येथून प्रवास करावा लागतो. घोडबंदर मार्गावरून ठाणे-बोरिवली बसगाड्या, एसटीची देखील सर्वाधिक वाहतुक होते. हे अंतर वळसा घालून असल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर गाठण्यासाठी सुमारे एक तास लागतो. वाहतुक कोंडी झाल्यास हे अंतर पार करण्यासाठी सुमारे दीड तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची देखील वाहतुक होते.

त्यामुळे येथील प्रवास धोकादायक देखील ठरतो. ठाणे ते बोरिवली हे अंतर वाहन चालकांना गाठता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (एमएमआरडीए) घोडबंदर येथील चितळसर मानपाडा जवळील मुल्लाबाग परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून दुहेरी भुयारी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास अवघ्या १५ मिनीटांत बोरिवली गाठता येईल असा दावा राज्य शासनाकडून केला जात आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

– हा प्रकल्प ११.८४ किमी लांबीचा आहे. त्यापैकी १०.२५ किमी मार्ग संजय गाधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा म्हणजेच बोगद्याचा असेल. बोगद्यात दोन समांतर रस्ते बांधले जातील. बोगदा पूर्णपणे जमीनीखालून असणार आहे. असे असले तरी जैवविविधतेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

– भरपाई वृक्षारोपणाचा भाग म्हणून ११ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

– हा प्रकल्प आगामी ठाणे कोस्टल रोड आणि इतर प्रमुख रस्त्यांशी जोडला जाणार आहे.

– नाशिक, नवी मुंबई आणि कल्याण येथून येणारी वाहने ठाणे शहराला वळसा घालून थेट बोगद्यात प्रवेश करु शकतील.

– बोरिवलीच्या दिशेने उड्डाणपूलांची जोडणी केल्याने दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिमेला प्रकल्प जोडला जाईल.

कसा असेल बोगदा

– भारतातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एक हा बोगदा असेल. बोगदा तीन-तीन पदरी असेल. बोगद्यात प्रत्येकी दोन वाहतुकीसाठी आणि एक आपत्कालीन मार्ग असेल. या प्रकल्पामुळे ठाणे-बोरिवली अंतर २३ किमी वरून १२ किमी पर्यंत कमी होणार असून ९० मिनीटांचा प्रवास १५ मिनीटांत होणार आहे. बोगद्यात प्रगत व्हेंटिलेशन आणि अग्निसुरक्षा प्रणाली असेल.

तसेच स्मोक डिटेक्टर, एलईडी लाइटिंग आणि दिशादर्शक असतील. संपूर्णपणे भूमिगत मार्गामुळे कमीतकमी पर्यावरणीय व्यत्यय. पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी गाळ विल्हेवाट प्रणालीची पुनर्रचना, ध्वनी आणि वायू प्रदूषण मर्यादित करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टची लांबी कमी केली (३५० मीटरवरून १०० मीटर), डंपट्रकसाठी समर्पित मार्गिका आणि ७ मीटर रुंद सेवा रस्ते.

नायक आणि अर्जुन

– ठाणे बाजूला ”नायक” आणि ”अर्जुना” नावाच्या टीबीएमचा वापर करून बोगद्याचे बांधकाम केले जात आहे.

यातील दोन ठाणे बाजूकडून आणि दोन बोरिवली बाजूकडील असली. टीबीएमची लांबी ९० मीटर, वजन २ हजार ५०० टन आणि व्यास १३.३४ मीटर असेल. मुंबईत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या

कटरहेड्सपैकी एक आहे.

हे यंत्र ”सिंगल-शील्ड, ओपन-टाइप” रचनेचा वापर करून चालते. कठीण खडकाळ परिस्थितीसाठी अत्यंत महत्त्वाचे काम बजावते. टीबीएमच्या संरचनात्मक रचनेत उत्खननादरम्यान स्थिरता राखण्यासाठी पुढील, मध्यवर्ती आणि मागील शील्ड्सचा समावेश आहे.