ठाणे – ठाणे शहरातील काही भागांत पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांची दुराव्यस्था झाल्याचे चित्र दिसत आहे. तुटलेले पदपथ, गायब झालेली गटारांची झाकणे, बांधकामांसाठी साठवणूक केलेले साहित्य, फेरीवाल्यांचे अडथळे, अनधिकृत फलक, साचलेला कचरा यामुळे पादचाऱ्यांना या मार्गावरून चालताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे नौपाड्यातील गोखले रोड, टेकडी बंगला परिसर, कोपरी उड्डाणपुल, हरीनिवास चौक, ठाणे रेल्वे स्थानक यांसारख्या ठिकाणीही तुटलेल्या पदपथांमुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तर ठाणे बाजारपेठ, गावदेवी परिसर, या ठिकाणी फेरीवल्यांकडून पदपथ अडवला जात आहे. ठाणे शहरातील नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरून सुरक्षितपणे ये -जा करता यावी यासाठी पदपथ बांधण्यात आले मात्र, अनेक ठिकाणी या पदपथांचीच दुरवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
नौपाड्यातील गोखले रोड परिसरातील पदपथ तुटलेल्या अवस्थेत असून, काही ठिकाणी झाडांच्या मुळांमुळे पदपथाचा काही भाग वर आला आहे तर काही भाग खचला आहे. तसेच या भागात कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढावे लागत आहे. याशिवाय, टेकडी बंगला परिसरात नाल्यालगतच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला असून, त्याचा मलबा परिसरात साचला आहे. यामुळे पादचाऱ्यांच्या मार्ग अधिक अरुंद झाला आहे. दरम्यान, कोपरी पुलाजवळ रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या पुलावरील संरक्षण जाळी चा काही भागही तुटलेल्या अवस्थेत आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजारपेठ परिसरात फेरीवाल्यामुळेही रस्त्याची अडवणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पदपथावर भिक्षेकरी बसलेले असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे, त्यातच परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून, नागरिकांना अस्वच्छ वातावरणातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक सुविधांच्या देखभालीच्या कामांवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे.
मोहिम राबवूनही पदपथ चालण्या योग्य नाही ठाणे महापालिका अंतर्गत ‘माझा फुटपाथ, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, मोहिमेनंतरही शहरातील काही भागांमध्ये पदपथांची दुरवस्था कायम असून, ते पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ठाणे शहरातील बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित पदपथ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात आले. तरी देखील शहरातील काही भागांतील पदपथांची दुरवस्था कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट मुंबई उच्च न्यायालयाने पदपथांच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून, पदपथ केवळ पादचाऱ्यांच्या सुरक्षित चालण्यासाठी असतात, त्यावर कोणतेही व्यावसायिक स्टॉल, दुकाने किंवा अनधिकृत अतिक्रमण करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. असे निर्देश देऊनही ठाणे शहरातील अनेक भागांत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रतिक्रिया सार्वजनिक सुविधांची देखभाल करणे गरजेचे आहे. कुठे गटाराचे झाकण नाही आहे तर कुठे संरक्षण जाळी तुटली आहे. कोणतीही घटना घडण्याची वाट न पाहता दुरुस्ती करावी. – दिक्षा पाटील, पादचारी
केबल टाकण्याच्या कामांमुळे पदपथांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे रस्ता खोदला जात आहे. तरीही दिवाळीपर्यंत पदपथ दुरुस्त करण्यात येतील.— हृषीकेश जावळेकर, कार्यकारी अभियंता, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कोट
टेकडी बंगला परिसराची लवकरात लवकर पाहणी करून प्रस्ताव तयार करून दुरुस्ती करण्यात येईल-केशव कांबळे, कार्यकारी अभियंता, टेकडी बंगला
