सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांची नावे असल्याचे उघड झाले आहे. या चौघांनी मंगळवारी सकाळी वेगवेगळ्या वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अंतरिम जामिनाकरिता धाव घेतली असली तरी न्यायालयाने त्यांना अद्याप दिलासा दिला नसल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांच्या न्यायालयात चौघांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी त्यांच्या वकिलांनी अंतरिम जामीन देण्याकरिता न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले आणि याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
तसेच २९ ऑक्टोबरला सुधाकर चव्हाण यांच्या अर्जावर, तर ३१ ऑक्टोबरला नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण या तिघांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. तेव्हा पोलिसांची बाजू ऐकल्यानंतरच न्यायालय अंतिम निर्णय घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तोपर्यंत न्यायालयाने या चारही जणांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
हा खटला चालविण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांची नियुक्ती केल्याची माहितीही पोलिसांनी दिली.