ठाणे : जेवायला बसलो आणि इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलो होतो. हालचाल करता येत नव्हती. परंतु प्रयत्न करुन मोबाईल बाहेर काढला आणि पहिला संपर्क भावाला साधला. तोपर्यंत बचाव पथकाची वाहने आली होती. मोबाईलचा टाॅर्च (विजेरी) सुरु केली, एका कर्मचाऱ्याचे लक्ष गेले आणि जीव वाचला असे राम विलास राम म्हणाले. कोहिनूर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून राम विलास राम हे मासिक चार हजार रुपयांच्या भाडेतत्त्वावर राहत होते.
गुरुवारी रात्री ११.३० वाजता ते एकटे जेवण्यासाठी चौथ्या मजल्यावर आले होते. जेवणाचे ताट वाढल्यानंतर अचानक इमारत कोसळली आणि राम विलास राम हे ढिगाऱ्याखाली अडकले. या स्थितीत त्यांनी तात्काळ खिशातून मोबाईल काढला आणि गावातील त्यांच्या चुलत भावाला संपर्क साधला. तसेच, त्यानी नातेवाईकांना इमारत दुर्घनटेबाबत माहिती देऊन त्यांचा जीवंत असल्याची माहिती दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथके घटनास्थळी पोहचली होती.
बचाव पथके पोहचत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलची विजेरी (टाॅर्च) सुरु केली. त्याचवेळी एका कर्मचाऱ्याचे विजेरीच्या उजेडाकडे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. दोरी आणि जिन्यांच्या साहाय्याने त्यांना वाचविण्यात यश आले. दुर्घटना झाली त्यावेळी माझे हात-पाय थरथरत होते. समोर मृत्यू उभा होता. सुदैवाने मी बचावलो असे राम विलास राम यांनी सांगितले.
