ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या जनगणना मोहिमेचा आढावा घेताना, कोणतेही घर जणगणनेशिवाय राहू नये यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. १४ जून २०२६ पर्यंत १०० टक्के जनगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून सध्या शहरात ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

देशभरात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही शहरातील जनगणनेचे काम हाती घेतले आहे. महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत जनगणनेच्या कामाचा प्रभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती यांच्यासह सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

ठाणे शहरातील नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत एकूण ५ हजार २८४ घरगट तयार करण्यात आले आहेत. या घरगटांमध्ये अंदाजे ७ लाख ३४ हजार ४९६ घरांचा समावेश आहे. जनगणनेसाठी शहरभरात ५ हजार ३२३ प्रगणक आणि ८५२ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी बैठकीत दिली. सध्या शहरातील सुमारे ४० टक्के जनगणनेचे काम पूर्ण झाले असून निर्धारित मुदतीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान काही प्रभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि नागरिक उपलब्ध न होण्यासारख्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या अडचणींवर तातडीने उपाययोजना करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच ३० मे २०२६ पर्यंत किमान ७० टक्के जनगणनेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्व सहाय्यक आयुक्तांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जनगणना हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक, पर्यवेक्षकांना प्रत्येक घराची अचूक नोंद करण्याचे आवाहनही केले.