ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर बसला. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे २० मिनीटे उशीराने सुरु आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. तर दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री घरी परतताना आणखी अडचणी निर्माण होतील की काय, अशी चिंता अनेक नोकरदारांना सतावत होती.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सलग सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्याने अनेकांनी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आता सोमवारी कामाचा आठवड्यातील पहिलाच दिवस असल्याने खासगी कंपन्यात काम करणारे अनेक नोकरदार घराबाहेर पडले. परंतु रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला.

मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ ते २० मिनीटे उशीराने सुरु होती. लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने फलाटांवर प्रवाशांची संख्या वाढत गेली. काही ठिकाणी प्रवाशांना एक-दोन गाड्या सोडून पुढील लोकलची वाट पाहावी लागली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील तसेच उपनगरीय लोकल सेवेत झालेल्या विलंबाचा परिणाम सकाळच्या गर्दीच्या वेळेवर झाला. अनेक नोकरदारांना कार्यालयात वेळेवर पोहोचता आले नाही. जे नोकरदार कामावर पोहोचले, त्यांच्या मनात परतीच्या प्रवासाबद्दल भिती निर्माण झाली होती. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवेवर आणखी ताण येणार असल्याची चिंता त्यांच्या मनात होती.