ठाणे : केंद्रीय वस्तू सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग ठाणे आयुक्तालयाच्या करचोरी विरोधी पथकाने सुमारे १७२ कोटी रुपयांचा बनावट इनपुट क्रेडिट (आयटीसी) घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी फ्लोरिडा साॅल्व्हेंट प्रा. लि. कंपनीच्या संचालकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भौमिक गांधी असे अटकेत असलेल्या कंपनीच्या संचालकाचे नाव आहे. भौमिक याने प्रत्यक्ष वस्तूंची खरेदी विक्री न करता केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून सुमारे १७२ कोटी रुपयांचे इनपुट क्रेडिट मिळविण्यासाठी हा गैरप्रकार केला. तपासा दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनी पुरवठादारांच्या ठिकाणांची झडती घेतली असता, त्या कंपन्या अस्तित्वातच नव्हत्या किंवा त्यांचे नोंदणी क्रमांक रद्द झाल्याचे आढळून आले. याव्यतिरिक्त, संचालक भौमिक याच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीमध्ये काही पुरावे पथकाच्या हाती लागले.

ज्यामध्ये वस्तूंची देवाण-घेवाण न करता केवळ कागदोपत्री आयटीसी मिळवित असल्याचे सिद्ध झाले. तसेच सीजीएसटी कायदा २०१७ चे कलम ७० अंतर्गत स्वतःहून दिलेल्या जबाबात या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे भौमिक याने मान्य केले. तसेच यातून दलाली मिळवणे आणि बेकायदेशीर नफ्याचा थेट लाभ घेतल्याची कबुलीही त्याने दिली. भौमिक याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू असल्याची माहिती सीजीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.