ठाणे : ठाण्यातील चरई परिसरात जुन्या इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विकासकांकडून अधिकाऱ्यांच्या संगनमताने इमारती धोकादायक घोषित करून नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी हस्तक्षेप करत रहिवाशांचे हक्क अबाधित ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भाजपाच्या खोपट येथील ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात जुन्या ठाण्यातील चरईतील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली. सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करुन त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे, अशा स्वरूपाची नागरिकांनी तक्रार केली. तसेच या प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली. यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या.
चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
जन आंदोलनाची तयारी
विविध प्रकल्पांत बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिली आहेत. मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काचे घरही नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती केळकर यांनी दिली.
शाळेची चौकशी करून कारवाई करा
या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्यादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली.
