ठाणे : ठाणे शिळफाट येथील कल्याण फाटा जवळ मंगळवारी रात्री एका टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून जात असलेल्या एका अज्ञात वाहनाला धडक बसली. या अपघातामुळे ठाणे येथून कल्याण फाटाकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून वाहनामध्ये अडकलेल्या टँकर चालकास अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
गुजरातवरून डोंबिवली, कल्याण येथे जाण्यासाठी शिळफाटा मार्गे टँकर चालक वाहतूक करत होता. यावेळी या टँकरमध्ये २४ टन अनिलिन रसायन होते. हे रसायन रासायनिक रंग, पॉलिमर आणि औषधांसह विविध रसायनांच्या उत्पादनात वापरले जाते. या रसायनाची वाहतूक करत असताना मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास टँकर चालक शिळफाटा येथील कल्याण फाटा जवळ आला. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
यामुळे टँकरच्या समोर चालत असलेल्या एका अज्ञात वाहनाला टँकरची धडक बसली. या अपघातात टँकरच्या केबिनचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच, ठाणे शहर वाहतूक पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांच्या मदतीने टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे ठाणे येथून कल्याण फाटाकडे जाणारी वाहतूक सुमारे ३० मिनिटे धिम्या गतीने सुरू होती. पथकांनी अपघातग्रस्त टँकर हायड्रा या यंत्राच्या साहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.