ठाणे– : वाढदिवस म्हणजे कुटुंबासाठी आनंदाचा क्षण… घरात उत्साह, मुलांचा जल्लोष आणि खास केक कापण्याची तयारी. मात्र एका कुटुंबासाठी हाच आनंदाचा दिवस काही वेळातच भीतीच्या अनुभवात बदलला. वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये लपलेल्या धातूच्या वस्तूंमुळे एका चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्याच्या पोटात केकमध्ये सजावटीसाठी लावलेल्या धातूच्या पिना गेल्या होत्या. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय)) सर्व अन्न पदार्थ विक्रेते व्यावसायिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील हिरानंदानी येथे राहणाऱया स्नेहा शेलार यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने स्पायडरमॅन थीमचा केक मागविला होता. केकवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र हीच सजावट करताना वापरण्यात आलेल्या काही वस्तूंमध्ये धातूच्या पिना किंवा तारा असल्याचे नंतर समोर आले. केक खात असताना मुलाला काहीतरी कठीण वस्तू तोंडात लागली. त्यानंतर पालकांनी तातडीने लक्ष दिले असता, केकच्या सजावटीमध्ये वापरण्यात आलेल्या धातूच्या वस्तू मुलाच्या शरीरात गेल्याचा संशय आला.

मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धातूचे काही तुकडे शरीरात गेल्याचे आढळून आले. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने मोठा धोका टळला. या घटनेनंतर खाद्यपदार्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः केक, मिठाई, बेकरी पदार्थ आणि सजावटीच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू ग्राहकांसाठी सुरक्षित आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने याच पार्श्वभूमीवर सर्व अन्न व्यावसायिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

सूचनेत काय म्हटले..

एफएसएसएआय च्या निदर्शनास आले आहे की, काही अन्न व्यावसायिक सजावटीचे केक, इतर खाद्यपदार्थ तयार करताना तसेच खाद्यपदार्थांची पाकिटे, केक बॉक्स, मिठाईचे बॉक्स, स्नॅक पॅकेट्स, घरपोच खाद्यपदार्थांचे पॅकेज आणि इतर पॅकेजिंग साहित्य बंद करण्यासाठी धातूच्या पिना/स्टेपल पिन व तारा वापरत आहेत.

अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये केक किंवा खाद्यपदार्थांच्या पॅकेजमध्ये धातूच्या पिना अडकलेल्या किंवा जोडलेल्या आढळल्या आहेत. यामुळे अन्न सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ग्राहकांकडून चुकून या पिना गिळल्या गेल्यास दुखापत होण्याची तसेच आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सर्व अन्न व्यावसायिकांना निर्देश खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थांचे पॅकेट, घरपोच पार्सल, बेकरी उत्पादने, केक बॉक्स, मिठाईचे बॉक्स, स्नॅक पॅकेट किंवा कोणतेही खाद्यपदार्थ पॅक/बंद करण्यासाठी धातूच्या पिना, तारा किंवा अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर तात्काळ बंद करावा असे निर्देश विभागाने दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम २००६ तसेच संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे निर्देशात म्हटले आहे. त्यामुळे याची अमलबजाणी होणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.