ठाणे : वसंत विहार, बॅरिस्टर नाथ पै (ग्लॅडिस अल्वारिस) मार्ग परिसरातील पाचशेहून अधिक रहिवाशांनी रविवारी वर्तुळाकार मेट्रोचा प्रस्तावित मार्ग बदलावा, या मागणीसाठी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा खेवरा चौक येथून सुरू झाला. या मार्गावरील विविध गृहसंकुलातील रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला.

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामेट्रो आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वर्तुळाकार मेट्रो मार्गिकेचे निर्माण काम सुरु आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित मार्गिका, प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड यामुळे प्रकल्पाला मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. रविवारी बॅरिस्टर नाथ पै मार्ग परिसरातील नागरिकांनीही विरोध दर्शविला.

नाथ पै मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणी येतात. नाथ पै मार्ग मार्ग परिसरात हिरवळ, चांगले पदपथ आहेत. परंतु वर्तुळाकार मेट्रोमुळे या मार्ग परिसरात मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असल्याचे येथील काही रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रस्तावित वर्तुळाकार मेट्रोचा मार्ग नाथ पै मार्गावरून न नेता, तो प्रस्तावित फूटहिल रस्त्यावरून वळवावा, किंवा भूमिगत करावा, अथवा अन्य कोणत्याही पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी मागणी करत रविवारी सकाळी ८ वाजता जी.ए. रोड – बॅ. नाथ पै रोड रहिवासी कृती समितीने मोर्चा काढला.

मोर्चात व्हॅली टॉवर, ऍक्मे ओझोन, ईडन वूड्स, हिरानंदानी मेडोज, हरसिद्ध पार्क, निहारिका, लोकपुरम, अशर, अशर एज, वसुंधरा, ग्लेंडेल, लोक उपवन, अशर इन्फिनिटी, हिरानंदानी इस्टेट तसेच नाथ पै मार्गावरील आणि वसंत विहार येथील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याचे समितीने स्पष्ट केले.