शहापूर: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजित वेळेनुसार रविवारी भारतात परतणार होते. परंतू, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द करण्यात आल्याने त्यांचा परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे.
दुबईत अडकलेल्या नागरिकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर व मुरबाड तालुक्यातील प्रवाशी आहेत. त्यामध्ये एकूण २३ जणांपैकी १२ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक नातेवाईकांनी अद्याप तहसील कार्यालय किंवा पोलिस प्रशासनाशी अधिकृत संपर्क साधलेला नाही. मात्र, समाजमाध्यमांवर संदेश पसरल्यानंतर शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तलाठ्यांना संबंधित कुटुंबांची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या अडचणीत अडकलेल्या नागरिकांना केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदत करून सुरक्षितपणे मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
– दुबईत अडकलेल्या पर्यटकांची नावे…
एकनाथ धनके (६७), गुलाब धनके (६२), शिवराम वाळिंबे (६३), शुभांगी वाळिंबे (५९), केशव वेखंडे (७०), कविता वेखंडे (६१), मधुकर पाटील (७२), मीनाक्षी पाटील (६४), बाळू गायकर (७०), वनिता गायकर (६८), दशरथ हरड (७४), शारदा हरड (६५), किसन मोहपे (७०), मीरा मोहपे (६२), परशुराम गायकवाड (६१), शुभांगी गायकवाड (५३), रमेश धलपे (६०), लता धलपे (५२), वासुदेव शेलार (७०), सपना शेलार (६२), करुणा कापरे (५९), अनिता धनके (७१) तसेच टूर मॅनेजर मनीष सानप (४९) यांचा समावेश आहे.
– दुबईत अडकलेल्या पर्यटकांकडून मदतीची मागणी…
दुबईत अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे तातडीने भारतात सुरक्षित परतण्याची मागणी केली आहे. परंतू, परतीचा प्रवास असल्याने सध्या या नागरिकांकडे पैसे शिल्लक राहिले नाही. यामुळे हॉटेलचे देयक आणि खर्च आता देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे रमेश धलपे यांनी सर्व पर्यटकांच्या वतीने मदतीची मागणी भारत सरकारकडे केली आहे. हे सर्व भारतीय नागरिक दुबईतील ए वन फहादी स्ट्रीटवरील ग्रँड ॲस्टोरिया हाॅटेल मध्ये असल्याचे कळते आहे.
