ठाणे : येथील बाळकुम-साकेत मार्गावर उभारण्यात आलेल्या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्ताने पुढील तीन दिवस म्हणजेच, ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत बाळकुम नाका ते कळवा क्रिकनाका या मार्गावर अवजड वाहतूकीला प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार असून यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे.
बाळकुम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार, महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराची उभारणीचे काम अडीच वर्षांपुर्वी हाती घेण्यात आले. यातील त्रिमंदिराचे काम पुर्ण झाले असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
पुढील तीन दिवस म्हणजेच, ३० जानेवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बाळकुम नाका ते कळवा क्रिकनाका या मार्गावर अवजड वाहतूकीला प्रवेश बंद असणार आहे. ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायु तसेच गॅस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
असे आहेत वाहतूक बदल
कळवा क्रिक नाक्याकडून साकेत मार्गे बाळकुमकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांना साकेत कॉम्पलेक्स जवळील महालक्ष्मी मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने साकेत कॉम्प्लेक्स येथील महालक्ष्मी मंदिर येथून मुंबई महामार्गावरून इच्छित स्थळी जातील. कशेळी कडून बाळकुम मार्गे साकेत कडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पुढे सरळ जावून माजिवडा प्रभाग समिती चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
माजीवडा गावातून लोढा संकूलातून बाहेर पडून साकेतकडे जाणाऱ्या वाहनांना लोढा संकूलातुन बाहेर पडण्याचे ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने लोढा संकुलातून बाहेर पडण्याचे ठिकाणी डावे बाजूस वळण घेवुन बाळकुम नाका मार्गे इच्छित स्थळी जातील किंवा लोढा संकुलातून बाहेर पडण्याचे ठिकाणी यु टर्न घेवुन लोढा संकुलातून बाहेर पडून माजिवडा गोल्डन नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

