ठाणे – सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरात कट्ट्यांची परंपरा गेले अनेक वर्षांपासून लाभली आहे. सांस्कृतिक, सामाजिक, सांगितीक, अभिनय, भटकंती असे विविध कट्टे शहरात सक्रिय असून या कट्ट्याच्या माध्यमातून विविध सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांचे प्रबोधन केले जाते. आता, या कट्ट्यांसह ठाणे शहरात यंदाच्या विज्ञान दिनाच्या दिवशी ‘विज्ञान कट्टा’ सुरु होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली. त्यामुळे आता ठाणेकरांना सांस्कृतिक- सामाजिक विषयांसह वैज्ञानिक विषयांची विविध माहिती या कट्ट्याच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.

आचार्य अत्रे कट्टा, भटकंती कट्टा, संगीत कट्टा, अभिनय कट्टा, कुसुमाग्रज कट्टा, रसिक वाचक कट्टा असे विविध कट्टे गेले अनेक वर्षांपासून ठाणे शहरात नित्यनियमाने सुरु आहेत. या कट्ट्यांच्या माध्यमातून ठाणेकरांना मनोरंजनासह एकप्रकारे त्यांची वैचारिक भूक भागविण्याचे काम केले जाते. आता, या कट्ट्यांमध्ये आणखी एका कट्ट्याचा समावेश होत आहे.

समाजात तसेच आताच्या तरुण पिढीमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी, विज्ञान विषयाचे नवनविन विषय त्यांना समजावे याउद्देशाने येत्या विज्ञान दिनाच्या दिवशी म्हणजेच, शनिवारी, २८ फेब्रुवारी पासून शहरात नव्याने विज्ञान कट्ट्याला सुरुवात होणार आहे. हा कट्टा ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावालगत असलेल्या उद्यानात भरविला जाणार आहे. मराठी विज्ञान परिष, ठाणे विभागाच्या वतीने हा कट्टा राबविला जाणार असून महिन्यातून एक दिवस या कट्ट्यावर वैज्ञानिक विषयाशी निगडित व्याख्यान आयोजित केले जाणार असल्याची माहिती दा.कृ.सोमण यांनी दिली.

विज्ञान कट्ट्यावर या विषयांवर व्याख्याने होणार

या विज्ञान कट्ट्यावर दर महिन्याचा एक दिवस ठरवून व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, आहार याविषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ वक्त्यांना बोलावले जाणार आहे. तसेच समाजातील अंधश्रद्ध दूर व्हावी यासाठी देखील विविध विषयांवर व्याख्यान घेतली जाणार आहेत. अगदी तरुण वर्गापासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्व वयोगटातील श्रोते या कट्ट्यावर यावे यासाठी प्रयत्न असणार आहे, असे दा.कृ.सोमण म्हणाले.

या कार्यक्रमापासून कट्ट्याची सुरुवात…

विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञान कट्ट्याची सुरुवात होणार आहे. त्यानुसार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पाचपाखाडी येथील कचराळी तलाव उद्यानात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता- एक वरदान’या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डाॅ. प्रशांत कानडे आणि श्री.दा.कृ.सोमण या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपस्थितांना मोठ्या दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्रही दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.