ठाणे : ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी विविध चर्चा शहरात रंगल्या असतानाच, आता शहर विकास विभागातील नस्ती गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आजी-माजी कर्मचाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

काही महिन्यांपूर्वीच ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याविरोधात लाचेप्रकरणी कारवाई झाली होती. त्यांच्या अटकेनंतर महापालिकेतून त्यांचे निलंबन झाले. परंतु हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते. तसेच महापालिकेच्या कारभाराविषयी देखील टीका होत होती. त्यातच आता महापालिकेतील शहर विकास विभागातील विकास प्रस्तावातील एक नस्ती गायब झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविल्यानंतर ही कागदपत्रेच उपलब्ध नसल्याचे आढळून आले.

कार्यकारी अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, ठाण्यातील एका व्यक्तीने सुमारे दीड वर्षांपूर्वी विकास प्रस्तावातील साक्षांकीत प्रत मिळविण्यासाठी महापालिकेत माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता. त्यांना संबंधित कागदपत्रे मिळविण्यासाठी शुल्क भरावे लागेल असे कळविले. परंतु शुल्क भरल्यानंतरही त्यांना कोणतीही कागदपत्रे पुरविण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी अपील अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. अपील अर्जानंतरही त्यांना कोणतीही माहिती प्राप्त होऊ शकली नाही. अखेर त्यांनी १० महिन्यांपूर्वी राज्य कोकण खंडपीठाकडे अपील अर्ज केला. तसेच याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. संंबंधित उप अभियंत्यांनी ही माहिती कार्यालयात उपलब्ध नसल्याचा खुलासा केला.

३० जुलैला राज्य माहिती आयोगाने सुनावणी घेऊन नस्ती उपलब्ध नसेल तर शपथपत्र लिहून देण्याचे आदेश महापालिकेस दिले. २९ ऑक्टोबरला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत शपथपत्र राज्य माहिती आयोगाला दिले. तसेच ही नस्ती कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून गहाळ झाल्याचेही म्हटले. अखेर आयोगाने याबाबत फौजदारी कारवाई करुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आणि त्यासंदर्भाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार याप्रकरणी महापालिकेचे आजी माजी लिपीक, शिपाई यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.