ठाणे : ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर विरोधी पक्ष नेता कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार, याविषयी शहरात चर्चा सुरू झाली आहे. पालिकेत १२ नगरसेवक इतके संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल, असे बोलले जात असतानाच, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही या पदावर दावा करत या पदासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आधीच पक्ष विलनीकरणावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतमतांतरे असतानाच, आता ठाण्यात विरोधी पक्ष नेते पदावरून दोन्ही राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ७५, भाजप २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १ आणि अपक्ष १ असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एकत्रित येऊन सत्तास्थापन केली. यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आता विरोधी पक्ष नेता कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार, याविषयी शहरात चर्चा सुरू झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले असून हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. २८ नगरसेवक निवडून आणत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला पण, तो शिंदेच्या सेनेसोबत सत्तेत सामील झाला. यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल, असे जवळपास मानले जात आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही या पदावर दावा करत या पदासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे दोन पर्याय पक्षाने उघड केले नसले तरी, एमआयएम पक्षाचे पाच आणि अजित पवार गटाचे ९ असे एकूण १४ नगरसेवक होतात. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन या पदावर दावा करतील असा अंदाज वर्तविला जात आहे. चौकट ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक शानू पठाण यांच्यात विळा-भोपळ्याचे नाते आहे. राष्ट्रवादी एकसंघ असतानाही त्यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले होते. मुल्ला हे एकेकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. ते पालिकेचे विरोधी पक्ष नेताही होते. महापौर पदाची निवडणुकही त्यांनी लढविली होती. मात्र, मुल्ला आणि आव्हाड यांच्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला. याच काळात शानू पठाण हे आव्हाडांच्या जवळ गेले आणि ते पालिकेत विरोधी पक्ष नेताही झाले.
आता त्यांना पक्षाचा गटनेताही केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच नाव पुढे येईल, अशी चर्चा आहे तर, अजित पवार गटाकडून मुल्ला यांचे नाव विरोधी पक्ष नेत्यासाठी पुढे येईल, असे बोलले जात आहे. कोट ठाणे महापालिकेत चांगले कामकाज व्हावे, सभागृहात कोणत्याही प्रकारच्या राजकारणाविना ठाणे शहरातील विकासे कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. चांगल्या कामांना आमचा पाठींबा असेल आणि वाईट कामांना विरोध हीच आमची भुमिका असेल. तसेच महापालिकेत आमच्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल. या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात प्रस्ताव पालिकेला देण्यात येईल. आमच्याकडे विरोधी पक्ष नेते पदासाठी दोन पर्याय आहेत.
नजीब मुल्ला ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष
ठाणे महापालिकेत विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक आमच्या पक्षाचे आहेत. तसेच आमच्या पक्षाचे १२ आणि उबाठाचा एक नगरसेवक असे १३ नगरसेवक आमच्याकडे आहेत. विरोधी पक्ष नेते पदासाठी विधीमंडळाप्रमाणे पालिकेत संख्याबळाचा नियम नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचाच विरोधी पक्ष नेता होईल.- मनोज प्रधान ठाणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष

