ठाणे : ठाणे शहरातील कचरा उचलण्यापासून रस्ते सफाईपर्यंतच्या संपूर्ण स्वच्छतेची जबाबदारी आता तीन कंत्राटदारांकडे दिली जाणार असून या कामासाठी दहा वर्षांत तब्बल ३३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. असे असले तरी कंत्राटदाराच्या कामाची रोज नोंद ठेवून त्याच्या कामगिरीनुसार देयक दिले जाणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या कामाची पालिका प्रशासनाने निविदा काढली आहे. कंत्राटदाराला ठरलेले संपूर्ण देयक सरसकट दिले जाणार नसून मासिक देयकातील ५० टक्के रक्कम निश्चित खर्चासाठी, तर उर्वरित ५० टक्के रक्कम कामगिरीच्या निकषांनुसार दिली जाणार आहे. कामात त्रुटी आढळल्यास दंडाची रक्कम वजा करून देयक अदा केले जणार असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. चेन्नई शहराच्या धर्तीवरही योजना राबवली जाणार असून या कंत्राटातून शहर स्वच्छ होणार की, पुर्वीप्रमाणेच ही यंत्रणा नावापुरती राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्र १२८ चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. शहरातील वाढती गृहसंकुले, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि विविध विकासकामांमुळे दररोज बाहेरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे तीन ते चार लाख आहे. त्यामुळे दररोज सुमारे १५०० ते १६०० मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. सध्या घराघरांतून कचरा संकलन, कचरा वाहतूक आणि रस्ते सफाईसाठी स्वतंत्र यंत्रणा व कंत्राटदार आहेत. घंटागाड्या आणि कचरावाहक वाहनेही भाडेतत्त्वावर कार्यरत आहेत. मात्र, या व्यवस्थेतील त्रुटींमुळे एकात्मिक स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर आता निविदा काढण्यात आल्या असून नव्या वर्षात ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
अशी असेल नवी व्यवस्था
शहराचे तीन भाग करून प्रत्येक भागाची संपूर्ण स्वच्छता एका कंत्राटदाराकडे सोपवली जाणार आहे. पहिल्या भागात दिवा, मुंब्रा आणि कळवा असून त्यासाठी दहा वर्षांत ११०३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसऱ्या भागात माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि लोकमान्य-सावरकरनगर असून ११६९ कोटी रुपये, तर तिसऱ्या भागात उथळसर, नौपाडा-कोपरी आणि वागळे क्षेत्र असून १०२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घराघरांतून कचरा संकलन, वाहतूक, रस्त्यांची हाताने आणि यंत्राद्वारे सफाई, बाजारपेठांची स्वच्छता, झोपडपट्टी भागातील विशेष स्वच्छता, जनजागृती आणि कचरा वर्गीकरण अशी कामे कंत्राटदार करणार आहे. ओला, सुका, आरोग्यास घातक आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करून संकलित कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे.
जबाबदारी निश्चित होणार वेगवेगळ्या कंत्राटांमुळे कचरा किंवा अस्वच्छतेची जबाबदारी कोणाची, यावरून सध्या गोंधळ निर्माण होतो. जबाबदारी झटकण्याचे प्रकार घडतात. नव्या पद्धतीत एका भागाची संपूर्ण जबाबदारी एकाच कंत्राटदाराकडे असल्याने जबाबदारी निश्चित करता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे. तक्रारींचीही सुविधा नागरिकांना भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे स्वच्छतेच्या तक्रारी करता येणार आहेत. तक्रारीचे ठिकाण, कारवाई आणि निकाली काढण्याचा कालावधी नोंदवला जाईल. तसेच वाहनांची संख्या, संकलित कचरा, झालेली सफाई आणि तक्रारींचे निवारण याची दैनंदिन नोंद ठेवली जाणार आहे.
