ठाणे : राज्य सरकारने समूह पूनर्विकास प्रकल्प (क्लस्टर) योजना क्रांतीकारी योजना आणली. परंतु प्रत्यक्षात ही योजना बांधकाम व्यवसायिकांनी खाऊन टाकली असा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. तसेच, ठाण्यात एकही क्लस्टर निर्माण झाले नसल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात मिनी क्लस्टर राबविण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्य सरकारने नागरिकांना सुरक्षित आणि नियोजित घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविलेली समूह पुनर्विकास (क्लस्टर) योजना ही योजना होती. या योजनेनुसार धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा क्लस्टर योजनेद्वारे घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी क्लस्टर योजनेविषयी आरोप केले. राज्य सरकारने समूह पूनर्विकास प्रकल्प (क्लस्टर) योजना क्रांतीकारी योजना आणली. परंतु प्रत्यक्षात ही योजना बांधकाम व्यवसायिकांनी खाऊन टाकली की काय, असा आरोप भाजपचे ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी केला. ठाण्यात ४४ आराखडे तयार केले. परंतु एकही आराखडा बघायला मिळत नाही. बांधकाम व्यवसायिक या प्रकल्पात शिरले असून त्यांनी झोपडपट्टीधारकांना सळो की पळो केले आहे. या क्रांतीकारी योजनेचे कशी वाट लावता येईल, हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही केळकर म्हणाले. बांधकाम व्यवसायिकांनी धुमाकूळ माजविला असेल तर त्यावर ‘मिनी क्लस्टर’ योजना राबवा अशीही मागणी केळकर यांनी केली.