ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेवरून ठाण्यातील राजकीय भूमिका आता चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. क्लस्टर विकास कंपनीला विरोध करीत काही दिवसांपूर्वी महापालिकेवर मोर्चा काढणारे आमदार जितेंद्र आव्हाड हेच सिद्धेश्वर क्लस्टरच्या भूमिपूजनाला उपस्थित राहिले. तर मनसे नेते अविनाश जाधव हेही सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयोजित निर्धार मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे शिंदे यांच्या क्लस्टर योजनेला आव्हाड आणि मनसेचा पाठिंबा, अशी चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या अधिकृत, अनधिकृत इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या एकत्रित पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना राबविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी ठाणे बंद, मोर्चे आणि आंदोलनेही झाली. त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही आमदार जितेंद्र आव्हाड आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी क्लस्टरची गरज असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच तेही या योजनेसाठी सुरुवातीला आग्रही होते. मात्र, गेल्या काही दिवसांत आव्हाडांची भूमिका वेगळ्या कारणाने चर्चेत आली. त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढत क्लस्टरच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्लस्टर विकास कंपनीला विरोध केला. महापालिकेचे अधिकार एका कंपनीकडे देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या कंपनीला देण्यात आलेल्या १३० कोटी रुपयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ठाण्यात पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि अन्य नागरी समस्या असताना क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतला. गरीबांच्या घरांवर गदा आणून विकासकांचे हित साधले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. असे असतानाच, आव्हाड हे सिद्धेश्वर क्लस्टरच्या भूमिपूजनाला उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले. क्लस्टरला विरोध की क्लस्टरच्या अंमलबजावणीच्या पद्धतीला विरोध हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनसेची भूमिकाही चर्चेत

दुसरीकडे, शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी रविवारी लक्ष्मी पार्क रस्त्यावर निर्धार मेळावा घेतला. लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरातील क्लस्टरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करण्यात आला. भाजप तसेच शिंदे सेनेचे नगरसेवक उपस्थित असलेल्या या व्यासपीठावर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीनेही लक्ष वेधले. जाधव यांनी क्लस्टरला थेट समर्थन देण्याऐवजी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण मेळाव्याला उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. या योजनेत नागरिकांना घर कसे मिळणार, त्यांचे पुनर्वसन कसे होणार, नव्या घराच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च कोण करणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्यासपीठावर दिलेली माहिती आणि आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत तर नागरिकांच्या बाजूने उभे राहून विरोध करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्लस्टर योजना काय?

ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांचा एकत्रित पुनर्विकास करून नागरिकांना सुरक्षित आणि हक्काची घरे देणे, तसेच नियोजित नागरी सुविधा निर्माण करणे हा क्लस्टर योजनेचा उद्देश आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्याने, शाळा, क्रीडा सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास या योजनेत अपेक्षित आहे. सिद्धेश्वर परिसरातील क्लस्टरमध्ये पाच हजारांहून अधिक रहिवाशांना कायमस्वरूपी हक्काची घरे देण्याचे नियोजन आहे.

क्लस्टर योजनेला आमचा विरोध नाही. ही योजना मार्गी लागावी यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यापूर्वी आंदोलने केली आहेत. गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना या योजनेतून घरे मिळणार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी ही योजना स्वागतार्हच आहे. मात्र, या योजनेत आठऐवजी बारा एफएसआय देऊ नये, तसेच क्लस्टर योजना राबविताना रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवरही महापालिकेने भर द्यावा, अशी आमची मागणी आहे. महापालिकेने दिलेल्या निमंत्रणावरूनच आमदार जितेंद्र आव्हाड सिद्धेश्वर तलाव येथील क्लस्टर प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहिले होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.