scorecardresearch

ठाण्याला क्लस्टर योजनेशिवाय पर्याय नाही!; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मत

ठाणे शहरातील झोपडय़ा, चाळी तसेच बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासाकरिता समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले.

ठाणे शहराचा विविधांगी आढावा घेणाऱ्या ‘तलाव ते टॉवर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे राज्याचे नगरविकास मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे सहप्रायोजक (डावीकडून) तन्वी हर्बलच्या डॉ.मेधा मेहंदळे, क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, टीप-टॉप प्लाझाचे रोहित शहा आणि पुराणिक बिल्डर्सचे आशिष बोस हे उपस्थित होते.

ठाणे  : ठाणे शहरातील झोपडय़ा, चाळी तसेच बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासाकरिता समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले. ‘लोकसत्ता’च्या ‘तलाव ते टॉवर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या हस्ते शनिवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे झाले. या कार्यक्रमात शिंदे म्हणाले, ठाण्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. टॉवर उभे राहिले म्हणजे, शहराचा विकास झाला असे म्हणता येत नाही. प्रत्येक शहराला एक संस्कृती असते. ठाण्याला एक इतिहास आहे. पूर्वी नौपाडा परिसर म्हणजे ठाणे म्हणून ओळखले जात होते. आता ठाणे वाढत गेले आहे. वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र होता. या कारखान्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत होते. त्या कामगारांसाठी वागळे इस्टेट भागात चाळी उभारण्यात आल्या. त्यावेळी परवडणारी घरे उपलब्ध नसल्यामुळे गरजेपोटी या चाळींच्या दाटीवाटीने इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर या सर्व वस्तींना अनधिकृत इमारतींचा शिक्का लागला. या शहराला सुनियोजित शहर करायचे असल्यास त्याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही. या योजनेसाठी नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये मैदाने, उद्यान, रुंद रस्ते तसेच इतर पायाभूत सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. शहराला अधिकचे पाणी कसे उपलब्ध व्हावे याचे नियोजन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असून  त्याचबरोबर तलावांचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे.

 गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, ठाणे आणि मुंबई ही शहरे कष्टकऱ्यांमुळे उभी राहिली आहेत. वागळे इस्टेट हा परिसर आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जात होते. याठिकाणी काम करणाऱ्या कामगार वर्गाला परवडणारी घरे उपलब्ध होत नव्हती. यातूनच या कष्टकऱ्यांच्या वसाहती शहरांमध्ये उभ्या राहिल्या. त्यांना अनधिकृतचा ठपका लावला जातो. मात्र, या गरजेपोटी उभ्या राहिलेल्या वसाहती आहेत. याचाही विचार होणे गरजेचे आहे. या भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी क्लस्टर योजनेशिवाय पर्याय नाही. येऊर हे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र आहे. या भागात विविध प्राणी-पक्ष्यांचा अधिवास आहे. या शांतता क्षेत्रामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पाटर्य़ामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. त्याचा आवाजही मोठा असतो. यामुळे येथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा वावर कमी होत आहे. या भागातील ध्वनिक्षेपकाचा आवाज बंद करावा अशी सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. या भाषणादरम्यान मंत्री आव्हाड यांनी ठाण्याचा इतिहास उलगडला.

ठाणे शहराच्या विविधांगी वैशिष्टय़ांचा आढावा घेणाऱ्या ‘तलाव ते टॉवर’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाच्या वेळी आम्ही ठाणेकर या मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (केमिकल्स) चे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर, निर्माता – दिग्दर्शक  रवी जाधव, ई.एन.टी. तज्ज्ञ डॉ.आशेष भूमकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी सहभागी होऊन जुन्या ठाण्याशी असलेल्या आठवणीबरोबरच ठाण्याचा इतिहास उलगडला.  ठाणे शहरात वास्त्यव्यास येऊन पन्नास र्वष झाली असून येथील पायाभूत सुविधांमध्ये झालेली स्थित्यंतरे अगदी जवळून पाहिली असल्याचे सुहास जोशी यांनी सांगितले. तर  ठाणे शहरात आल्यावर एक मानसिक शांतता मिळत असल्याचे मत नितीन नाबर यांनी व्यक्त केले. चित्रपटसृष्टीत काम करत असताना ठाणे शहराने कायम आत्मविश्वास दिला असून या  शहरातील विकासकामांमध्ये कलात्मकता दिसून येत असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले. तर ठाणे शहरावर नितांत प्रेम असल्याने येथूनच वैद्यकीय सेवा सुरू केली, असे मत डॉ. आशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

राज्यातील उत्तम नाटय़गृह ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन हे नाटय़गृह राज्यातील उत्तम नाटय़गृह असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच या नाटय़गृहात बसविण्यात आलेल्या पडद्यवार अत्यंत सुरेख असे रेखीव काम करण्यात आले असून अशा पद्धतीचा पडदा जगातील कोणत्याही नाटय़गृहात पाहायला मिळणार नाही. मात्र काही वर्षांपूर्वी तो पडदा स्वच्छतेसाठी काढण्यात आला आणि त्याच्या जागी पालिकेतर्फे झालर असलेला लाल मखमली पडदा लावण्यात आला. त्यानंतर नक्षीकाम केलेला जुना पडदा पुन्हा लावण्यात आला. मात्र पालिकेने लावलेल्या लाल पडद्याची झालर तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षीकाम केलेल्या जुन्या पडद्याची शोभा जात असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane cluster plan opinions urban development minister eknath shinde housing minister jitendra awhad ysh

ताज्या बातम्या