ठाणे : ठाण्यातील क्लस्टर, एसआरए व पुनर्विकास योजनांच्या पार्श्वभूमीवर बोगस कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार करणारी टोळी सक्रिय असल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी गेल्या पाच वर्षांतील कर आकारणीचे लेखापरिक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित १४१व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ठाणे शहरात क्लस्टर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि पुनर्विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार करण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात पाचपाखाडी येथील एका प्रकल्पात बोगस करपावती तयार केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील कर आकारणीचे विशेष लेखापरिक्षण करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. शहरात सध्या विविध पुनर्विकास योजना मार्गी लागत आहेत. या योजनांमध्ये पात्रता निश्चित करण्यासाठी आणि इतर लाभ मिळविण्यासाठी करपावत्यांचा वापर केला जातो. याचाच गैरफायदा घेत बोगस कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
पाचपाखाडी येथील एका प्रकल्पात बोगस करपावती तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा प्रकार केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित आहे की आणखी ठिकाणीही असे प्रकार घडले आहेत, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या कर आकारणीचे लेखा परिक्षण करून संशयास्पद करपावत्यांची पडताळणी करावी, अशी मागणी केळकर यांनी केली.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची तक्रार
या जनसंवाद कार्यक्रमात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आपल्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा दावा केला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याने आपली बाजू मांडली. या प्रकरणाची माहिती घेऊन पाठपुरावा करण्यात येईल आणि त्यातील वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केळकर यांनी सांगितले.
