ठाणे : ठाणे शहरातील विशेषत: घोडबंदर भागातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी खाडी किनारी (कोस्टल रोड) प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या ठाण्यात सुरु आ हे. परंतु या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भरावामुळे बाळकुम ठाणे खाडी परिसरातील खारफुटी आणि नैसर्गिक जलप्रवाह धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भविष्यात ठाणे शहराला गंभीर पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो तसेच विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाची होत असलेली हानी, प्रशासनाची संशयास्पद मौनवृत्ती असल्याची टीका देखील काँग्रेसने केली.
कोस्टल रोडच्या कामासाठी अनेक ठिकाणी नाले, पाणथळ क्षेत्रे आणि खारफुटीलगत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी समुद्राकडे जाण्याचे नैसर्गिक मार्ग बाधित होत आहेत. खारफुटी ही केवळ झाडे नसून ती किनारपट्टीची नैसर्गिक सुरक्षा भिंत आहे. चक्रीवादळे, भरतीचा वाढता प्रभाव, पूरस्थिती आणि किनारी धूप यापासून संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम खारफुटी करत असते. खारफुटी नष्ट केली जात आहे, उद्या त्याची किंमत ठाणेकरांना महापुराच्या रूपाने चुकवावी लागू शकत.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाच्या घटना वाढत असताना नैसर्गिक जलमार्गांवर अतिक्रमण करणे आणि खारफुटी क्षेत्रांवर भराव टाकणे हे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत घातक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका, महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण आणि कांदळवन संरक्षण विभाग यांच्या भूमिकेवरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पर्यावरणीय नुकसान होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी कोणाच्या दबावाखाली गप्प आहेत, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
सखोल चौकशी व्हावी
काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, खारफुटी आणि नैसर्गिक जलप्रवाहांवरील परिणामांचा स्वतंत्र पर्यावरणीय अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, जर विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटला जात असेल, तर त्याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
” खारफुटी, नैसर्गिक जलप्रवाह आणि जैवविविधता ही ठाण्याची नैसर्गिक संरक्षण कवच आहेत. त्यांचे नुकसान झाल्यास भविष्यात पूर, पर्यावरणीय असंतुलन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. संबंधित ठिकाणी होत असलेल्या भरणीबाबत जिल्हाधिकारी, ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि कांदळवन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी. ” – राहुल पिंगळे (अध्यक्ष, काँगेस शहर जिल्हा ठाणे)
