Thane Collector Office Job Scam: आपण मंत्रालयात विधीमंडळात काम करतो. मंत्रालयात आपली ओळखआहे. अनेक मंत्र्यांशी परिचय आहे. या ओळखीतून आपणा यापूर्वी अनेक जणांना शासकीय नोकरीत लावले आहे. असे दोन महिलांना सांगून त्यांचा विश्वास संपादन करून नाशिकच्या एका भामट्याने राज्याच्या विविध भागातील ७ बेरोजगारांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांवर नोकरी लावण्यासाठी ४६ लाख रूपये उकळले. त्यानंतर नोकरी नाहीच, घेतलेले पैसेही परत न केल्याने फसवणूक झालेल्या एका नोकरदार महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सुषमा प्रमोद सिंग असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांची डोंबिवली जवळील पलावा खोणी भागातील एका गृहसंकुलात सदनिका आहे. जून २०२३ ते जून २०२५ या कालावधीत तक्रारदार सिंग यांच्या सदनिकेत संजय सतिश वानखेडे हे भाड्याने राहत होते. या कालावधीत संजय वानखेडे यांनी तक्रारदार महिलेला आपण मंत्रालय विधानभवनात काम पाहतो. मंत्रालयात आपली ओळख आहे. आपली अनेक मंत्र्यांशी परिचय आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच आपण शासकीय नोकरी लावण्याचे काम करतो. काही तरूणांना शासकीय नोकरी लावल्याची नियुक्ती पत्रे वानखेडे यांनी तक्रारदार सिंग यांना दाखवली होती.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई, टंकलेखक पदावर नोकर भरती आहे. तेथे आपले कोणी नातेवाईक नोकरीला लावायचे असेल तर सांगा आपण ते काम करून देतो, असा विश्वास वानखेडे यांनी सिंग यांना दिला. या नोकरीसाठी एका उमेदवारासाठी १५ लाख रूपये लागतील असे सांगितले. आपला परिचय असल्याने सिंग यांच्याकडून प्रत्येक उमेदवाराकडून १२ लाख रूपये घेण्याचे वानखेडे यांनी सांगितले. नोकरीचे नियुक्त पत्र मिळण्यापूर्वी ७ लाख रूपये देण्याची मागणी वानखेडे यांनी केली.
या बोलण्यावर विश्वास ठेऊन सिंग यांनी आपल्या नातेवाईक गोतावळ्यातील सपना काळे (कुर्ला), विनोद साबळे (कुर्ला), प्रेम शेषवरे, सुशांत पवार (सांगली), विजय मोरे (बेलापूर) यांना नोकरीला लावण्यासाठी पुढाकार घेतला. या उमेदवारांचे एकूण ७ लाखाप्रमाणे ३५ लाख २५ हजार रूपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले.
वानखेडे यांनी बनावट नियुक्ती पत्र तयार करून ती उमेदवारांना दाखवली. तुमची शासकीय वैद्यकीय तपासणी होईल. मग तुम्हाला हजर करून घेतले जाईल अशी कारणे वानखेडे सांगू लागले. सपना काळे यांना अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात हजार होण्याचे नियुक्त पत्र वानखेडे यांनी दिले. ते बनावट असल्याचे सिंग यांना समजले. त्यानंतर विविध कारणे देऊन वानखेडे आपण आता पलावा खोणी येथे राहत नाही. आपली पालघर येथे बदली झाली आहे अशी कारणे देऊन तक्रारदार सिंग यांना टाळू लागले. तुम्ही नोकरी देणार नसाल तर आमचे पैसे परत करा, असा तगादा तक्रारदाराने लावला. वानखेडे यांनी ३६ लाखाचे धनादेश सिंग यांना दिले. ते बँकेत वटले नाहीत. या रकमेतील ३ लाखाची रक्कम वानखेडे यांनी परत केली.
नाशिकमध्ये शोध
वानखेडे पलावा येथून घर सोडून निघून गेले. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने सिंग यांनी नाशिक येथील द्वारका काठे गल्लीतील त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यांच्या आईवडिलांनी त्याचा आमच्याशी काही संबंध नसल्याचे सिंग यांना सांगितले. सिंग यांच्या परिचितामधील नवी मुंबईतील माहेश्वरी पाटील यांच्या ओळखीतील मनोहर बजबळकर (उरण), प्रसाद काकेकर (सोलापूर) यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो सांगून वानखेडे यांनी त्यांच्याकडून १४ लाख रूपये उकळले. त्यांना उल्हासनगर तहसीलदार कार्यालयातील बनावट नियुक्ती पत्रे देऊन त्यांची फसवणूक केली आहे. मानपाडा पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
