ठाणे : समाज माध्यमांवर डिझेलच्या तुटवड्याबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निर्बंध घातले होते. परंतू, आता जिल्ह्यातील इंधन पुरवठा आणि वितरणाची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने हे निर्बंध आता शिथील करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश दिले होते. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विक्रीस बंदी होती. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. या निर्णयामुळे गृहसंकुलांना देखील फटका बसला होता.
यासंबंधीचे वृत्त लोकसत्ता ठाणे सहदैनिकात २ एप्रिल रोजी ‘उंच इमारतींतील रहिवासी अधांतरी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरुन खुल्या स्वरुपात इंधन विक्री करण्यास मनाई आदेश लागू केल्यामुळे मोठ्या गृहसंकुलांना याचा फटका बसल्याचा उल्लेख होता. या वृत्ताची दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २७ मार्च २०२६ च्या मूळ आदेशात अंशतः बदल करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत.
या सुधारित आदेशानुसार, डिझेल पंप मालकांनी आता डिझेलचे वितरण पूर्वीप्रमाणेच करावे. मात्र, कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त डिझेलची उचल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वाहनांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नेल्या जाणाऱ्या डिझेलच्या नोंदी अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचबरोबर डिझेलचा अनधिकृत साठा करणाऱ्यांविरुद्ध ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ नुसार कारवाई केली जाईल. तसेच,या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत,असेही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.
