बदलापूर/अंबरनाथः अंबरनाथ शहरातील सुमारे २१० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या शेतकी संस्थेची जागा ताब्यात घेण्याचे आदेश आणि बदलापुरातील सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवारी अंबरनाथ, बदलापुरात पाहणी केली. यावेळी त्यांनी अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकूल, बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणांवर भेट देत पाहणी केली. याबाबतचा अहवाल पुढे सादर केला जाणार आहे. यावेळी दोन्ही शहरातील न्यायालयाने आदेश दिलेल्या आणि सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणात स्थानिक प्रशासनाची झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.
अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेवरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत अंबरनाथ सामुदायिक सहकारी शेतकी सोसायटीची २१० एकर जागा शासनाने पुनर्ग्रहित करण्याचे आदेश दिले. या जागेची पाहणी करण्यासाठी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबरनाथ शहरात भेट दिली.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकी सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेची पाहणी केली. शहराच्या मोठ्या भागात विस्तारलेल्या आणि दोन महत्वाचे रस्ते असलेल्या या परिसरात महाविद्यालयासाठी कोणती जागा योग्य राहिल, त्याचे मार्ग कसे विस्तारू शकतील, पर्यायी मार्ग कसे उभारता येतील, याचीही चाचपणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. याप्रसंगी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार अमित पुरी उपस्थित होते. या पाहणीनंतर त्यांनी सध्या सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या जागेवर जात विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील एका गृहसंकुलाच्या सांडपाण्याच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीदरम्यान शहरातील सांडपाणी व्यवस्था आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यावर उच्च न्यायालयानेही संताप व्यक्त केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. तर अनधिकृत बांधकामांच्या कारवाईचाही आढावा घेतला. नगर परिषदेच्या कारवाईत ४ हेक्टरपर्यंत जागा मोकळी झाली असून ती ताब्यात घेऊन भविष्यातील अतिक्रमण रोखण्याचे आवाहन केल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार पाहणी
न्यायालयाच्या निर्देशानुसार बदलापुरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी करत माहिती घेतली. सांडपाणी कुठे जाते, प्रकल्पांची क्षमता काय हे समजून त्यासाठी उपाययोजना सूचवण्याच्या सूचना केल्या आहेत. १२ दशलक्ष क्षमतेचा प्रकल्प लवकरच सुरू होतो आहे. तोपर्यंत सांडपाणी पंपाने वळवण्याच्या सूचना केल्या आहेत. सांडपाण्यावर तृतीय स्तराची प्रक्रिया करण्यासाठी मदत करण्याबाबतही आश्वासीत केले आहे. – डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे.

