ठाणे : ठाण्यातील ऐतिहासिक व महत्त्वाच्या कॉमन मॅन सर्कलला सध्या राजकीय फलकबाजीचा घट्ट विळखा बसला आहे. या फलकांमुळे या परिसराला गबाळरूप आले आहे. या विद्रुपिकरणावरून समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त चौकाभोवती शुभेच्छांचे फलक लावण्यात आल्याने चौकाची ओळख लुप्त झाल्याचे चित्र आहे. फलकांमुळे चौक झाकोळला गेल्याने कॉमन मॅन सर्कल आहे की बॅनर सर्कल? असा उपरोधिक टोला समाजमाध्यमांवर विचारण्यात आला आहे.
कॉमन मॅन चौक ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आहे. या चौकाची शहरात ठसठशीत ओळख आहे. व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून केलेल्या भाष्याचा मूक साक्षीदार म्हणून ‘कॉमन मॅन’ वाचकांमध्ये लोकप्रिय ठरला. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि लोकशाहीतील त्यांच्या अस्तित्वाचे प्रतीक मानला जातो. या प्रतीकाचा पुतळा चौकाच्या मध्यभागी उभारण्यात आला. ठाणेकरांसाठी हा चौक शहराची एक वेगळी ओळख आहे. अनेक सामाजिक उपक्रम, आंदोलने, नागरिकांच्या मागण्यांचे आवाज याच परिसरातून वेळोवेळी उमटत असतात. अशा महत्त्वाच्या चौकाभोवती आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या आकाराचे शुभेच्छा फलक उभारण्यात आले आहेत. पुतळ्याच्या सभोवतालचा जवळपास संपूर्ण भाग फलकांनी झाकला गेला आहे. या चौकाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून, त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात, सार्वजनिक ठिकाणे आकर्षक करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, त्यानंतर चौक, पुतळ्यांभोवती आणि सार्वजनिक ठिकाणी राजकीय फलकबाजीचे पेव फुटते. शहराच्या सौंदर्यालाच यामुळे बाधा पोहोचत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलकांबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही अनधिकृत फलक हटविण्याच्या मोहिमा राबवल्या जातात. असे असतानाही शहरातील अत्यंत महत्त्वाच्या चौकात एवढ्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक कसे उभारले गेले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या निमित्ताने पुन्हा एकदा शहरातील सार्वजनिक जागांचा वापर, राजकीय फलकबाजीची मर्यादा आणि शहराच्या सौंदर्याचे जतन करण्याची जबाबदारी या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. कॉमन मॅन सर्कलसारख्या शहराच्या ओळखीच्या स्थळांचे मूळ स्वरूप जपण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे, याकडे लक्ष वेधले आहे.
समाजमाध्यमांवर… सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा बॅनरांच्या आड गेला, “
“शहर सुशोभीकरणाच्या घोषणा आणि प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण ” अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
