ठाणे – मतचोरीच्या आरोपांनंतर आता ठाण्यात काँग्रेसच्या कार्यालयाच्या नामांतरावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. बनावट संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षरीच्या आधारे युवक काँग्रेस कार्यालयाची महापालिका दप्तरील नोंद शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या नावावर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचा दावा करत दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी राहुल पिंगळे यांनी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

मतचोरीच्या आरोपांनंतर आता ठाण्यात काँग्रेसच्या कार्यालयाचीच ओळख बदलण्याचा कथित प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे युवक काँग्रेस कार्यालयाचे नाव शिवसेना जनसंपर्क कार्यालय केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असले, तरी दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि मूळ नोंद पूर्ववत करण्यासाठी राहुल पिंगळे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

वागळे इस्टेटमधील किसन नगर क्रमांक ४, रोड नंबर २८ परिसरातील मालमत्ता क्रमांक ८०२२६३४ ही काँग्रेस पक्षाची अधिकृत मालमत्ता असून, महापालिका दप्तरी तिची नोंद ”युवक काँग्रेस कार्यालय” अशी आहे. या मालमत्तेचा नियमित करही काँग्रेसकडून भरला जातो. मात्र, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नावाने कथित बनावट संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षरीचा वापर करून या कार्यालयाचे नाव बदलून ”सुरेश रमेश राम, शिवसेना जनसंपर्क कार्यालय, शांतिनगर” असे करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

या प्रकरणी काँग्रेसने १० सप्टेंबर २०२६ रोजी पुराव्यांसह महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, ५० दिवसांहून अधिक काळ उलटूनही कारवाई न झाल्याने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांचे अधिकृत मूळ पत्र आयुक्तांकडे सादर करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मात्र, केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंद बदलण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासून त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली. तसेच युवक काँग्रेस कार्यालयाची मूळ नोंद पूर्ववत करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रशासनाने सात दिवसांत योग्य कारवाई न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला आहे. काँग्रेसच्या मालमत्तेची नोंद बदलण्यामागील सूत्रधार कोण आणि या प्रकरणात महापालिकेतील अधिकाऱ्यांची भूमिका काय, याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.