ठाणे : सण-उत्सवांच्या काळात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून झाडांवर बेकायदेशीरपणे विद्युत रोषणाई करणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. झाडांना खिळे ठोकून किंवा विद्युत तारा गुंडाळून रोषणाई करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच संपूर्ण ठाणे शहरातील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई आणि गुंडाळलेल्या विद्युत तारा तातडीने हटविण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

ठाणे शहरात सण-उत्सवांच्या काळात सजावटीसाठी रस्त्यालगतच्या झाडांवर करण्यात येणाऱ्या बेकायदा विद्युत रोषणाईची ठाणे महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकून विद्युत तारा गुंडाळणाऱ्यांविरोधात वृक्ष संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच झाडांवरील विद्युत माळा, तारा आणि खिळे तातडीने काढून जप्त करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत. ठाणेस्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी या समस्येविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पुराव्यांसह तक्रार सादर केली होती. जोशी यांनी सादर केलेल्या तक्रारीसोबतच्या जिओ-टॅग छायाचित्रांमध्ये घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट आणि वसंत विहार येथील हिरानंदानी मेडोज परिसरासह शहरातील विविध भागांतील शेकडो झाडांवर विद्युत तारा गुंडाळल्याचे आणि झाडांच्या खोडांमध्ये लोखंडी खिळे ठोकल्याचे निदर्शनास आले. हे प्रकार महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची आणि उच्च न्यायालयातील प्रलंबित जनहित याचिकेची दखल घेत महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले आहेत.

शहरातील झाडांवर गुंडाळलेल्या विद्युत माळा, विद्युत तारा आणि ठोकलेले खिळे तातडीने काढून जप्त करावेत, झाडांचे नुकसान करणाऱ्या सोसायट्या, व्यापारी संकुले आणि संबंधितांवर वृक्ष संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच झाडांचे नुकसान होईल अशा प्रकारे सजावट करू नये, याबाबत शहरातील व्यावसायिक, दुकानदार आणि गृहनिर्माण सोसायट्यांना सक्त ताकीद देणाऱ्या जाहीर सूचना आणि परिपत्रके प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकणे आणि त्यांना विद्युत तारांनी जखडून टाकणे हा वृक्ष संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. शिवाय, हा निसर्गावर होणारा अमानुष अत्याचार आहे. महापालिका आयुक्तांनी आमच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि झाडांवरील रोषणाई हटवण्याचे आदेश दिले आहेत. शेकडो झाडांवर अखंडपणे विद्युत दिवे लावल्यामुळे स्थानिक तापमानात वाढ होते, झाडांवर आसरा घेणाऱ्या पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येतात. तसेच विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागण्याचाही धोका असतो. झाडांवरील शेवटचा खिळा आणि विद्युत तार निघेपर्यंत प्रशासनाने ही मोहीम अविरत सुरू ठेवावी, हीच आमची अपेक्षा आहे. – रोहित जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.