ठाणे : राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी आतकोली येथे भूखंड दिला असून या भूखंडावर दगडखाणी तयार करून कोट्यवधी रुपयांचा महसूल दगड माफियांनी बुडविल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. पालिका घनकचरा विभागाने दगडचोरीला का अभय दिले आहे. त्यात पालिकेचे अधिकारी सहभागी आहेत का, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला आहे.

भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महानगरपालिकेला दिली आहे. या भूखंडावर ठाणे महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. हे पालिका मालकीचे कचरा टाकण्याचे ठिकाण असतानाही दिवा परिसरात कचरा टाकला जात असल्याने आतकोली येथे पाहणीत दगडखाणी सुरू असल्याचे आढळून आल्याच दावा मनोज प्रधान यांनी केला आहे.

या ठिकाणी बेकायदा पद्धतीने दगडखाणी सुरू करण्यात आल्याची तक्रार पालिकेने १० जानेवारी २०२५ रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, ही तक्रार दाखल करतानाही पालिका घनकचरा विभागाने चलाखी केली होती. परंतु, ही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्याऐवजी पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पालिका अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर दगडखाण सुरू असताना अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करून पालिकेने कोणाला वाचविले होते, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला.

आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा २०२४ मध्ये पालिकेच्या ताब्यात आली आहे. ८४.२ एकरच्या या भूखंडावर आजही दगडखाण सुरू असून गेल्या काही महिन्यांत सुमारे ३० फूट खोदकाम करण्यात आले आहे. याचा अंदाज बांधल्यास मोठ्या प्रमाणात दगड काढण्यात आला असून त्यापोटी शासनाला मिळणारी हजारो कोटी रुपयांचे स्वामित्व धन (रॉयल्टी) जमा करण्यात आली नसल्याचा आरोप प्रधान यांनी केला.

जर ठाणे पालिकेने या जागेतील दगडखाणीचा रीतसर लिलाव केला असता तर पालिकेच्या तिजोरीत किमान १२ हजार कोटी रुपयांची भर पडली असती. मात्र, घनकचरा विभागाने चोरांच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्याचा आरोप प्रधान यांनी केला. दरम्यान, आपण या ठिकाणी भेट दिली असता येथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. दगडखाणींची जागा ठाणे पालिकेची नसल्याचे तेथील एक मजूर म्हणाल्याचे प्रधान यांनी सांगितले. याच ठिकाणी कचरा टाकल्यानंतर रिकाम्या डंपरमधून माती व खडी भरून त्यांची वाहतूक केली जात असल्याचेही दिसून आले.

गुरचरणाच्या जमिनीवरही बेकायदा दगडखाणी याच परिसरातील गुरचरण महाराष्ट्र सरकार (१०) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (१३) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (१४) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (३) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (४) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (५) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (६३) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (६९/२) [२२२], गुरचरण महाराष्ट्र सरकार (९) [२२२] या भूखंडांवरही दगडखाणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या दगडखाणींकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. या खाणींमधून दररोज हजारो ब्रास दगड काढला जात असून, तो याच परिसरात रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला विकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिकामे डंपर परत पाठविणारा कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते या भागाची पाहणी करीत असताना एका मार्गाने कचरा भरलेले डंपर कचरा टाकण्याच्या ठिकाणी येत होते. मात्र, गोदामांसाठी तयार केलेल्या रस्त्यावरून रिकामे डंपर कचरा टाकण्याच्या ठिकाणाच्या दिशेने येत होते. आपण या रस्त्यावर आल्यानंतर एक इसम डंपरचालकांना परत जाण्यासाठी हातवारे करताना दिसून आला. हा इसम कोण होता? पाहणी सुरू असताना तो रिकामे डंपर परत का पाठवत होता? यामागील कारणे संशयास्पद असल्याचेही मनोज प्रधान यांनी म्हटले आहे.

अँटनी लारा कंपनीकडे संशयाची सुई या ठिकाणी एक बाग तयार करण्यात आली असून, या बागेत अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा निळ्या रंगाचा फलक जमिनीवर लावलेला दिसून आला. याबाबत माहिती घेतली असता, ठाणे महानगरपालिकेने कार्यादेश क्रमांक ५७७ अन्वये अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला ३२९.४५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडची उपकंपनी असलेली ही कंपनी दररोज ६०० ते ८०० टन कचऱ्याचे विलगीकरण करणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान या ठिकाणी केवळ कचरा फेकून दिला जात असून प्लास्टिक, कागद, काच वा ओला कचरा वेगळा करण्यासाठी मनुष्यबळ किंवा यंत्रसामग्रीची कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही. या ठिकाणी कचऱ्यावर केवळ माती टाकली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे ३३० कोटी रुपयांचे कंत्राट घेतलेली अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रत्यक्षात करते काय? असा सवाल प्रधान यांनी उपस्थित केला आहे.

दगडचोरीच्या या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच ठामपा अधिकाऱ्यांसह अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचीही चौकशी करावी, अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे.