ठाणे : ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडापेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा खर्च आता ५५.५२ कोटींवर पोहोचला असून, आधी मंजूर रकमेपेक्षा तब्बल ११ कोटींची वाढ करण्यात आली आहे. या एकाच विषयाच्या दोन प्रस्तावांना शुक्रवारी झालेल्या सभेत गोंधळादरम्यान मान्यता देण्यात आली असून यात प्रति चौरसफुट तब्बल ९ हजार रुपये खर्च आकारला जात असल्याचा दावा करत भाजपने या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या महासभेपुढे दादोजी कोंडदेव क्रीडापेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्तारकामासाठी वाढीव खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. सुरुवातीला या कामासाठी सुमारे ४१.१२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेनंतर मे. शेठ कन्स्ट्रक्शन कंपनीला ७.२० टक्के वाढीव दराने ४४.४५ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते. जुन्या इमारतीची मजबुती अपुरी असल्याचे कारण देत नव्याने लोखंडी फ्रेमवर्क आणि स्वतंत्र कॉलम उभारण्याचे कारण पुढे करत प्रशासनाने वाढीव खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला होता.
वाढीव खर्चाचा प्रस्ताव का ?
प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले असता, ४० वर्ष जुनी असलेली ही इमारत अतिरिक्त भार सहन करण्यास सक्षम नसल्याचा अहवाल समोर आला. त्यामुळे मूळ आराखड्यात बदल करून इमारतीच्या बाहेरील बाजूस पाईल फाउंडेशन, स्वतंत्र कॉलम आणि लोखंडी फ्रेमवर्क उभारून वाढीव मजल्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलांमुळे बांधकाम क्षेत्र ३३६६ चौ.मी. वरून तब्बल ५९८२ चौ.मी. पर्यंत वाढले आहे. परिणामी, प्रकल्पाचा खर्च वाढून ५५.५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यात स्थापत्य, विद्युतीकरण, प्लंबिंग, फायर फायटिंग, लिफ्ट, जीएसटी, सल्लागार शुल्क आणि तांत्रिक लेखापरीक्षणाचा समावेश आहे. यासाठी शासनाकडून अतिरिक्त ११.०८ कोटी रुपयांची मागणी करावी लागणार आहे, असा दावा पालिकेेने प्रस्तावात केला होता.
भाजपचा आक्षेप..
दादोजी कोंडदेव क्रीडापेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाच्या वाढीव खर्चाचे दोन प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारच्या सभेत सादर केले होते. एक ७२ ब अंतर्गत तर, दुसरा ३५ (अ) अंतर्गत सादर केला होता. विषय मात्र एकच होता. या विषयावर सभेत बोलायचे होते. पण, गोंधळात दोन्ही प्रस्तावास मंजुरी देण्यात आली, असा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला. तसेच या प्रकल्पाच्या खर्चावरूनही त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. बाजारभावानुसार नवीन बांधकामासाठी प्रति चौरसफुट सुमारे ५ हजार रुपये खर्च येत असताना, या नूतनीकरणासाठी तब्बल ९ हजार रुपये प्रति चौरसफुट दर आकारण्यात येत आहेत. इतक्या खर्चात नवीन इमारत उभी राहिली असती, असा आरोपही त्यांनी केला.
