ठाणे – ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुलांना मेडल देण्याच्या मागणीसाठी ठिय्या मांडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र टिका होऊ लागली आहे. अशाचप्रकारे शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पालिकेच्या कारभारावर टिका करत जाहीर निषेध नोंदवला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही प्रशासनाने अलिशान गाड्यांवर निधी खर्च केला पण, मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी झालेल्यांना साधे मेडल देण्यासाठी निधी नाही, अशी टिका शेकापने केली आहे.
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पालिका मुख्यालयाजवळ भव्य व्यासपीठ उभारण्यात आला होता. तसेच स्पर्धेच्या निमित्ताने बॅनरबाजीही करण्यात आली होती. मात्र, स्पर्धेच्या नियोजनावरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली असून अनेक स्पर्धकांसह लहान मुलांनी मेडल देण्याच्या मागणीसाठी ठिय्या मांडला होता. यावरूनच आता शेतकरी कामगार पक्षाने पालिकेच्या कारभारावर टिका केली आहे. ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डळमळीत असतानाही प्रशासनाकडून सुरू असलेल्या आलिशान वाहनांच्या खरेदीवर आणि जनतेच्या पैशांच्या अपव्ययावर शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) तीव्र आक्षेप घेत जाहीर निषेध नोंदवला आहे.
लहान मुले अत्यंत उत्साहाने आणि भविष्याची मोठी आशा बाळगून महापालिकेच्या मॅरेथॉनमध्ये धावतात. मात्र, या लहान मुलांच्या हक्काच्या कौतुकासाठी, त्यांना देण्यासाठी साध्या मेडलसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. दुसरीकडे, महापालिकेची तिजोरी रिकामी आणि आर्थिक स्थिती बिकट असताना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी आलिशान वाहनांवर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा घोर अपमान आहे, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी केली आहे.
एकीकडे मुलांच्या उत्साहावर विरजण घालणारे पालिका प्रशासन दुसरीकडे स्वतःच्या सुखासाठी महापालिकेचा पैसा पाण्यात घालत आहे. हा थेट अन्याय असून शेकाप या व्हीआयपी संस्कृतीचा आणि पालिकेच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, असे ऋषिकेश तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. महापालिकेने हा वायफळ खर्च त्वरित थांबवून सर्वसामान्य जनतेच्या आणि मुलांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.
