ठाणे – दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळांच्या संघटनेने दिव्यातील सर्व अधिकृत शाळा १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने असोसिएशनला हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
आतापर्यंत तीन अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या असून उर्वरित अनधिकृत शाळांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी असोसिएशनला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालिकेने २०२५ मध्ये ८१ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात दिव्यातील ६१ शाळांचा समावेश आहे. त्यात यंदाच्या जून महिन्यात दिव्यात आणखी ८ अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत, अशी आकडेवारी मांडली होती.
या अनधिकृत शाळांमुळे पालकांची तसेच समाजाची दिशाभुल होत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी केला होता. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी दिव्यातील सर्व अधिकृत शाळा १ जुलै पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने यावेळी घेतला. परंतू, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसाण होण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनला पत्र देत, शाळा बंद आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच अनधिकृत शाळांबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईचा तपशील देखील या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
अनधिकृत शाळांबाबत तपशील
अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये. यासाठी व्यापक जनजागृती होणेकरिता अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वृत्तपत्रामध्ये आणि संबंधित शाळांच्या दर्शनी बाजूला फ्लेक्सव्दारे प्रसिध्द करण्यात आली आहे. अनधिकृत शाळांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत.
शाळांना दंड आकारणीसह ३२ शाळांचा पाणीपुरवठा बंद केल्याचा अहवाल प्राप्त आहे. शासन निर्देशानुसार या शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सदर अनधिकृत शाळांमध्ये एकही विद्यार्थ्यांचा प्रवेश न करण्याबाबत पुनश्चः नोटीसेस बजावण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी पथके गठीत
अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळेत करण्यासाठी सर्व मान्यता प्राप्त शाळा व्यवस्थापनाची सहविचार सभा घेतल्या आहेत. अनाधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करुन येत्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या पाल्यांचा प्रवेश नजिकच्या मान्यता प्राप्त शाळेमध्ये करण्याचे निर्देश दिले असून यासाठी ९ पथके गठीत केली आहेत.