ठाणे : मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला (२७) गुरुवारी ठाणे न्यायालयाने १९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती. वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे. सामजमाध्यमावर ‘मुधाजाला’च्या आधारे (हनीट्रॅप) त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे.
त्याला एटीएसच्या पथकांनी अटक केल्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीश जे. एस. जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील आणि वर्मा याचे वकील रुपाली शिंदे, राजहंस गिरासे यांनी युक्तीवाद झाला. त्यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर वर्मा याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
५ जूनला त्याला न्यायालयात पुन्हा सादर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १९ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. वर्मा यांच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे त्याचे वकील रुपाली शिंदे आणि राजहंस गिरासे यांनी सांगितले.