डोंबिवली – मी एकेकाला आता बघून घेतो, असे बोलत डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात डोंबिवली नागरी सहकारी बँक भागात शुक्रवारी रात्रीच्या वेळेत हातात धारदार चाॅपर घेऊन तो हवेत फिरवत दहशत पसरविणाऱ्या एका गुंडाला विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळील धारदार चाॅपर जप्त करून त्याच्या विरूध्द शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
विनायक संतोष नागोरकर (२४) असे गुन्हा दाखल तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील माऊल चाळ क्रमांक एकमध्ये राहतो. विष्णुनगर पोलीस ठाण्यातील हवालदार सुरेश निकुळे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांना गुप्त माहितगारातर्फे माहिती मिळाली, की डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात डोंबिवली नागरी सहकारी बँक असलेल्या भागात एक तरूण हातात धारदार चाॅपर घेऊन परिसरात दहशत पसरवत आहे.
एकेकाला बघून घेण्याची धमकी देत आहे. तो तरूण बेभान झाला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ही माहिती हवालदार निकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल शिनकर यांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी उपनिरीक्षक शिनकर यांच्यासह हवालदार कसबे, भाबड, बोडके यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना केल्या.
रात्री आठ वाजण्याची वेळहोती. पोलिसांना दूरवरून एक इसम हातात धारदार पाते असलेला चाॅपर घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले. त्याला पाहून काही रहिवासी लपून बसले होते. काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. बेभान झालेला हा तरूण आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पादचाऱ्यांना होती. त्यामुळे त्याच्या जवळून कोणीही जात नव्हता. आपणास पाहून हा तरूण पळून जाईल म्हणून पोलिसांनी आपले वाहन दूरवर उभे केले. आणि मोठ्या कौशल्याने त्याच्या भोवती सापळा लावला.
दोन पोलिसांनी शिताफिने त्या गुंडावर झडप घालून त्याच्या जवळील धारदार चाॅपर ताब्यात घेतला. या इसमाने आपले नाव विनायक नागोरकर असल्याचे सांगितले. आपण सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विनायकला ताब्यात घेतले. त्याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायदा आणि मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला. विनायकने जवळील चाॅपर कोठुन आणला होता. तो हा चाॅपर घेऊन कोणावर हल्ला करणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
