ठाणे : ठाण्यात गृहखरेदीसाठी ‘क्रेडाई-एमसीएचआय ठाणे’च्या वतीने ‘ठाणे मालमत्ता प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ठाण्यातील बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊन्टी परिसरात होणार आहे. प्रदर्शनात ४५ लाख रुपयांपासून परवडणारी घरे उपलब्ध असणार आहेत. तसेच २०३० पर्यंत रिअल इस्टेटच्या माध्यमातून शहराची अर्थव्यवस्था १५० अब्ज डाॅलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती ‘क्रेडाई एमसीएचआय ठाणे’चे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘क्रेडाई एमसीएचआय ठाणे’च्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘क्रेडाई एमसीएचआय ठाणे’चे अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैयाज विराणी, मालमत्ता प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, पूनर्विकास समितीचे अध्यक्ष महेश बोरकर, निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता, पूनर्विकास समितीचे सचिव अमित दातार, समिती सदस्य भावेश गांधी यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरात विविध पायाभूत सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे ठाणे शहरात गृहखरेदीस नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. एकाच छताखाली ठाणे शहरातील सर्व मालमत्तांचे प्रदर्शन पाहता यावे यासाठी क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊन्टी येथे मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशातील आघाडीच्या बांधकाम व्यवसायिकांकडून ठाणे शहरात सुरु असलेल्या विविध गृहप्रकल्पांसोबत नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांसोबत संपर्क साधता येईल. ‘महारेरा’ कायद्यातील तरतूदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाणार आहे.
या मालमत्ता प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रतिष्ठित गृहसंकुलातील घरांचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समाधान होईल असा विश्वास सचिन मिराणी यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच आठवड्यात घर आणि गुतंववणूकीसाठी मालमत्ता पाहून खरेदी करण्याची संधी मिळेल असे सचिव फैय्याज विराणी यांनी सांगितले. तर ठाणे शहर हे नागरिकांच्या पसंतीचे शहर होत आहे, शहरात गृहखरेदी वाढल्याचे प्रदर्शनाचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी सांगितले.
ठाणे शहर हे आलिशान घरांसाठी उत्तम पर्याय असल्याचे मत खजिनदार जय व्होरा यांनी व्यक्त केले. प्रदर्शानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घर आणि उत्तम जीवनशैलीचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे समितीचे युवा शाखा अध्यक्ष निमित मेहता यांनी सांगितले. तर गृहखरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कुटुंबाचे समाधान या प्रदर्शनाच्या माध्यातून नक्की होईल असे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा यांनी सांगितले.
एका लहान शहरातून मोठ्या विकसित आणि प्रगतीशील शहरापर्यंत ठाणे शहराचा प्रवास झाला. भविष्यात ठाणे हे मुंबई महानगरातील महत्त्वाचे शहर होईल. शहरातील उत्तम पायाभूत सुविधा, मुंबईसह राज्यातील इतर भागात पोहचण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि लवकरच सुरु होणाऱ्या मेट्रोसह विविध पर्याय आणि दर्जेदार जीवनशैली लक्षात घेऊन भविष्यासाठी ठाणे शहरामध्ये नागरिकांनी गृहखरेदी करावी. – जितेंद्र मेहता, माजी अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय ठाणे.
चौकट
आम्ही ‘ठाणे व्हिजन २०३०’ची घोषणा केली. त्यानुसार, ठाणे शहरामध्ये पर्यावरणाचे भान ठेवून उत्तम पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, डिजीटल प्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती होत आहे. सामुदायिक विकास, शहराचा सांस्कृतिक चेहरा जपण्यासोबत शांत आणि प्रसन्न शहर म्हणून शहराचे नावलौकिक निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. – सचिन मिराणी, अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय ठाणे.
चौकट
– या प्रदर्शनासाठी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला आनंद चित्रपटगृहासमोरून मोफत बसगाडी सेवा असेल. प्रदर्शनात १०० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्प, ८० हून अधिक नामांकित बांधकाम व्यवसायिक, १५ हून अधिक वित्त संस्था सहभागी होतील. प्रदर्शनात वातानुकूलीत मंडप व्यवस्था असेल. १७ ते १९ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते ७ यावेळेत प्रदर्शन खुले असेल. पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश मिळेल. पूर्व नोंदणी https:www.credaimchi.com या संकेतस्थळावर करता येईल.
