गुन्हे वृत्त : तरुणावर प्राणघातक हल्ला

याप्रकरणी या चारही जणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रांसोबत गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणावर चौघांनी धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. म्हसोबानगर येथील रमेश भोईर चाळीत राहणारा राकेश ढोबळे (१८) हा सोमवारी रात्री कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथे तन्मय मापारी, ओमकार रमाणी व मयूर भोईर या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्या वेळी कारमधून आलेल्या प्रल्हाद पाटील, मनोज फोडसे, अविनाश फोडसे व त्याच्या एका साथीदाराने राकेशवर धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी या चारही जणांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाच्या अधिक तपास पोलीस करीत आहेत.

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

कल्याण- पश्चिमेतील योगीधाम येथील किकस्टन सोसायटीत राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा तिच्या सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये नाही तर घटस्फोट घे अशी धमकी सासरची मंडळी तिला लग्न झाल्यापासून देत होती. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू होता. या जाचाला कंटाळून विवाहितेने मंगळवारी पती प्रीतम पातकर, सासू मनीषा पातकर, सासरा प्रदीप पातकर, दीर सूरज पातकर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक तासात चोरी

कल्याण- पूर्वेतील काटेमानिवली येथील ओम मांगलेश्वर सोसायटीमध्ये अवघ्या एका तासात चोरटय़ांनी घर फोडून ४२ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी २ वाजता घरातील कुटूंब बाहेर गेले असता चोरटय़ांनी या संधीचा फायदा घेऊन घराचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर घरातून ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला. दुपारी ३ वाजता ते कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडी विकण्याच्या बहाण्याने लुटले

उल्हासनगर- कॅम्प नंबर चारमधील महात्मा फुले नगरमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला भांडी विकण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या चोरटय़ा महिलांनी ५८ हजारांना लुटल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारी ही महिला तिच्या लहान मुलासह घरात

असताना दोन भांडीविक्रेत्या महिला भांडी विकण्याच्या बहाण्याने घरात आल्या. त्यांनी महिलेला भुरळ पाडून घरातून ५८ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९३ हजारांची रोकड चोरीला

उल्हासनगर- कॅम्प तीन येथे रहाणारी ५३ वर्षीय व्यक्ती ही सेल्समनचा व्यवसाय करते. मंगळवारी दुपारी ही व्यक्ती घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या हातातील पिशवी खेचून पोबारा केला.

या पिशवीत ९३ हजार ५८० रुपयांची रोकड होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरटय़ांचा तपास पोलीस करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane crime

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या