ठाणे : भिवंडी येथील दर्गारोड भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. फैजल अन्सारी (४४), अन्वर अन्सारी (३४) आणि अब्दुल अन्सारी (२०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ७४ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील मोमीनबाग दर्गारोड परिसरात असलेल्या अन्वर अन्सारी यांच्या घराजवळ फैजल अन्सारी हा अब्दुल रहमान अन्सारी याला गांजासारखा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी गुन्हे शाखा घटक २ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला.
या कारवाईत फैजल अन्सारी(४४), अब्दुल अन्सारी (२०) आणि अन्वर अन्सारी यांना अटक करण्यात आले. या आरोपींची अधिक तपासणी करताना फैजल आणि अब्दुल यांच्या अंगझडतीत आणि अन्वर याच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये ७४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा ३७ लाख ३७ हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे.