ठाणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात याने अनेकांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच, ठाण्यातही एका कुटुंबाची भोंदूने विविध पूजा, न्यायालयीन खटले लढविण्याची कारणे सांगून

सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात भोंदू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.घोडबंदर भागात फसवणूक झालेली २५ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह राहतात. तिचे वडील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे. त्यांच्या समाजाचा मुंबईमध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी तिच्या आईची ओळख एका भोंदूसोबत झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये ठाण्यात देखील एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर भोंदू तरुणीच्या घरी आला होता. त्यावेळी तरुणीच्या आईने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याचे त्या भोंदूला सांगितले.

यावर उपाय करु असे सांगून भोंदू तिथून निघून आला. चार ते पाच दिवसांनी त्याने तरुणीच्या आईला संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना त्यांचा मत्सर वाटत असल्याने काळी जादू केल्याचे सांगितले.

भोंदूकडून फसवणूक

– काळी जादू उलटविण्यासाठी विधी करावे लागतील असे त्याने सांगितले. त्यानंतर भोंदू तरुणीच्या कुटुंबाशी वारंवार संपर्क साधायचा. एकदा तरुणीचे वडिल कारने जात असताना त्यांच्या कारमध्ये बिघाड झाला होता. परंतु ते अपघातातून बचावले. त्यानंतर त्यांचा भोंदूवर आणखी विश्वास बसला. फेब्रुवारी २०२४ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्याने तरुणीच्या कुटुंबाकडून विधीसाठी १० लाख रुपये घेतले. त्याने तरुणीच्या वडिलांचे एका महिलेसोबत संबंध असून त्या महिलेच्या नावाने तिच्या वडिलांनी दोन स्थावर मालमत्ता, सोन्याचे दागिने आणि कार घेतल्याचे सांगितले. तसेच ती महिला आणि त्यांचे नातेवाईक मिळून काळी जादू करत असल्याची बतावणी त्या भोंदूने पुन्हा केली. काही दिवसांनी त्याने तरुणीच्या कुटुंबाकडून त्याच्याविरोधातील न्यायालयीन प्रकरणे लढविण्यासाठी पैशांची मागणी केली.

गुन्हा दाखल

– तरुणीच्या कुटुंबाने त्याच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये टप्प्याटप्प्याने पाठविले होते. त्यानंतरही तो पैशांची मागणी करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, तरुणीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत एकूण १ कोटी ६५ लाख रुपये फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.