ठाणे : महिला सुरक्षाविषयी विविध चर्चा केल्या जात असताना ठाण्यातील वागळे इस्टेट भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पायी जाणाऱ्या एका तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकाविल्यानंतर तिने प्रतिकार केल्याने तिला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे.

कळवा येथील खारेगाव भागात २९ वर्षीय मुलगी राहते. ती वागळे इस्टेट भागातील रोड क्रमांक २२ परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता ती कामाहून घरी परतत असताना रोड क्रमांक २२ येथून पायी जात होती. त्याचवेळी एक तरुण तिच्या दिशेने आला. त्याने तरुणीला धक्का दिला. तसेच ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न करु लागला. तरुणीने त्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने तिला खाली पाडले तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने तिचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल खेचून तेथून निघून गेला. याप्रकरणी तरुणीने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु आहे.