गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद

सोनसाखळी आणि घरफोडय़ांपाठोपाठ आता दुचाकी चोरही शहरात सक्रीय झाले असून गेल्या दोन दिवसात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात सात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोनसाखळी आणि घरफोडय़ांपाठोपाठ आता दुचाकी चोरही शहरात सक्रीय झाले असून गेल्या दोन दिवसात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात सात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, अंबरनाथ शहरात एकाच दिवसात तीन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. या घटनांमुळे शहरातील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  या घटनेप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
ठाणे : ठाणे तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारी सोनसाखळी चोरांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून बुधवारी तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यात चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.
आझादनगर येथील ब्रह्मांडमध्ये राहणाऱ्या लता पाटील (६०) राहत असून त्या परिसरातील स्वस्तिक पार्कच्या बस स्टॉप जवळून जात असताना सोनसाखळी चोराने त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र खेचून नेले. ठाण्यातील राममारुती रोड वरून जात असताना राजश्री पाटील (४७) यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी खेचून नेले. उल्हासनगर येथील महात्मा गांधी नगरात मनुरभा गांधी (६८) राहतात. दोघा भामटय़ांनी त्यांच्याकडील ५५ हजारांचे दागिने लुटले. या तिन्ही घटनेप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

सुरक्षा रक्षकाला चौघांची मारहाण
ठाणे : पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून चार तरुणांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री नौपाडा परिसरात घडली. राकेश लालजी पाठक (२३) असे सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सागर मूळचंद माळवे, संदीप, किरण आणि त्याचा भाऊ अशा चार जणांविरुद्ध नौपाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नौपाडय़ातील प्रशांतनगर येथील तिरूपती बिल्डरच्या बांधकाम साईटवर राकेश काम करतो. पंधरा दिवसांपूर्वी सागर माळवे याने राकेशला मारहाण केली होती. याप्रकरणी राकेशने नौपाडा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीचा राग मानात धरून सागर आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मंगळवारी रात्री राकेशवर पुन्हा हल्ला केला.

‘तरुणांनो, वाहनवेगावर नियंत्रण ठेवा!’
डोंबिवली : ‘‘वाहन चालवायला मिळाले की तरुण मंडळी ते विमानाच्या वेगाने चालवण्याचा प्रयत्न करतात आणि लाखमोलाचा आपला जीव धोक्यात घालतात. प्रत्येक तरुणाने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे आणि वाहतुकीच्या नियमाप्रमाणे वाहन चालवावे,’’ असे आवाहन कल्याण ‘आरटीओ’चे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी येथे केले. रिक्षा संघटनेतर्फे ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे कोहिनूर सभागृहात आयोजन केले होते. या वेळी तोंडवळकर शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘आरटीओ’ अधिकारी गंभीर, पवार, अधीक्षक रवींद्र कुलकर्णी, मुख्याध्यापक नितीन तोंडवळकर उपस्थित होते.

* डोंबिवली पूर्व येथील पेंडसेनगरमधील पितृस्मृतीमध्ये राहणारे गणेश परेन यांची दुचाकी चोरीस गेली आहे. त्यांच्या मित्राला त्यांनी चालविण्यासाठी ही दुचाकी दिली होती. दिवा परिसरातील एका इमारतीखाली मित्राने दुचाकी उभी केली असता, चोरटय़ांनी ती चोरून नेली.
* भिवंडीतील निजामपुरा परिसरात राहणारे फैजल अहमद अली पटेल (४९) यांच्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरटय़ांनी चोरून नेली.
* भिवंडी येथील कामतघर परिसरातील काटेनगरमध्ये राहणारे नीलेश बोद्दल (२९) यांनी कृष्णा कॉम्पलेक्स भागात पार्क केलेली दुचाकी चोरीस गेली असून याप्रकरणी शाबाद समसूद खान (२४) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
* कल्याण येथील रामबाग लेन परिसरात राहणारे सुरेश शेट्टी (५६) यांनी घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरटय़ांनी चोरून नेली.
* अंबरनाथ स्थानक परिसरातील आयडीबीआय बँकेजवळ भैरव अपार्टमेंटमध्ये हरीश पाटील राहत असून त्यांची इमारतीखाली उभी असलेली दुचाकी चोरीला गेली.
* वडवली दत्तमंदिराजवळील नीरज अपार्टमेंटमध्ये राहणारे रोहन वाघमारे यांचीही दुचाकी चोरीस गेली आहे.
*  ग्रीन सिटी येथील नागरिक मनोजकुमार पाल यांची दुचाकी अ‍ॅक्सिस बँकेजवळील पे अँड पार्क मधून चोरीला गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane crime news in shorts

ताज्या बातम्या